सावित्रीच्या लेकींनी भरविला आठवडी बाजार
By Admin | Published: July 17, 2014 12:39 AM2014-07-17T00:39:50+5:302014-07-17T00:39:50+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळाचे पाठबळ: शौचालय बांधण्याची महिलांनी घेतली प्रतिज्ञा
सोलापूर: ग्रामीण भागात राहणाऱ्या मात्र महिला बचत गटाच्या माध्यमातून एकमेकींचा ‘पदर’ जुळलेल्या बोरगाव-देशमुख (ता़ अक्कलकोट) इथल्या ‘सावित्रीच्या लेकींनी’ मोठ्या धाडसाने गावात आठवडी बाजार सुरू केला़ दर बुधवारी हा बाजार भरणार असून, डिसेंबरअखेर प्रत्येक जणींनी घरात शौचालय बांधण्याचीदेखील प्रतिज्ञा घेतली़ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मआविम) पाठबळामुळे हे शक्य झाले़
कोसो दूर जाऊन बाजार करण्यापेक्षा आपल्याच गावात आठवडी बाजार भरावा, ही बऱ्याच दिवसांची कल्पना महिलांनीच पूर्ण केली आहे़ यासाठी त्यांनी कोल्हापुरातील मंडपाळे गावात जाऊन पाहणी केली, प्रशिक्षण घेतले आणि गावात आठवडी बाजार सुरू करण्यासाठी पदर खोचला, त्यात त्यांना यश आले़ श्री स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्र, ग्रामपंचायत आणि मआविम यांच्या संयुक्त विद्यमाने हा बाजार सुरू केला. बुधवारी सुमारे ३०० ते ४०० महिलांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी एस़ एम़ भालेराव, मआविमचे जिल्हा समन्वयक कुंदन शिनगारे यांच्या हस्ते या आठवडी बाजाराचा शुभारंभ झाला़ अक्कलकोट शहरापासून सांगवीकडे जाणारा खड्ड्यांचा जीवघेणा रस्ता पार केल्यानंतर १५ किलोमीटरवर बोरगाव-देशमुख हे गाव लागते़ गाव पाणीदार मात्र आठवडी बाजार नसल्यामुळे वाहनाची विशेष सोय नसल्यामुळे पाच हजार लोकसंख्येचे गाव बऱ्याच दिवसांपासून आठवडी बाजारासाठी प्रयत्नशील होते़ याला बुधवारी मूर्त स्वरूप आले़ महिला आर्थिक विकास महामंडळाने बचत गटातील महिलांच्या पंखांना बळ दिले. यावेळी बँक आॅफ इंडियाचे शाखाधिकारी एल़ एम़ कांबळे, सहायक गटविकास अधिकारी वैजिनाथ साबळे, स्टेट बँकेचे शाखाधिकारी बी़ बी़ बोधनकर, पंचायत समितीच्या सभापती विमलताई गव्हाणे, सुवर्णाबाईआलुरे, मआविमच्या दीपाली अध्यापक, सरपंच सुनंदा कामशेट्टी, उपसरपंच मौलाली पठाण आदी उपस्थित होते़ शौचालये बांधली तर गावासाठी सर्व योजना देऊ, असे गटविकास अधिकारी भालेराव यांनी सांगितले आणि महादेव मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात डिसेंबरअखेर आम्ही शौचालये बांधून घेऊ, अशी प्रतिज्ञा महिलांना दिली़ शाखाधिकारी बोधनकर, पं़ स़ सभापती गव्हाणे यांनी बचत गटाच्या या कार्याचे कौतुक केले़
सुप्रिया गायकवाड, शांता बंगरगे, सुचिता सुरवसे, सुनंदा देशेट्टी, स्वरांजली बिराजदार, सुवर्णा वाले, भाग्यश्री पाटील, सुमन फुलारे, सुलोचना गवी या महिलांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
---------------------------------------------
मशाल फेरी अन् पुरणपोळी
ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर हा आठवडी बाजार सुरू झाला़ यासाठी मंगळवारी रात्रभर पावसात महिलांनी गावातून मशाल फेरी काढून वातावरण निर्मिती केली़ बुधवारी सुमारे ६० महिलांनी भाजीपाल्यासह विविध वस्तंूचे स्टॉल लावले होत़े दर बुधवारी हा बाजार भरेल़ आठवडी बाजार पाहण्यासाठी बाहेरून आलेल्यांना पुरण-पोळीचे जेवण देण्यात आले़
--------------------------
ज्या गावात आठवडी बाजार भरत नाही, जेथे बचत गटाचे कार्य चांगले आहे, अशा गावांमधील महिलांना प्रशिक्षण देऊन आम्ही आठवडी बाजार सुरू केला़ जिल्ह्यात मसलेचौधरी, सौंदणे या दोन ठिकाणी आठवडी बाजार नियमित सुरू आहे़ महिलांना खूप चांगला नफा यात मिळत आहे़
- कुंदन शिनगारे
जिल्हा समन्वय अधिकारी मआविम