सावंत आणि पवार यांना आत्मविश्वास ठरला घातकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:18+5:302020-12-05T04:48:18+5:30

शिक्षक मतदारसंघात सोलापुरातीलच जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला होता. पवार हे निवडणूक रिंगणात दुसऱ्यांदा होते. त्यांना वर्षभरापूर्वीच ‘तयारीला लागा’, ...

Sawant and Pawar lost confidence | सावंत आणि पवार यांना आत्मविश्वास ठरला घातकी

सावंत आणि पवार यांना आत्मविश्वास ठरला घातकी

Next

शिक्षक मतदारसंघात सोलापुरातीलच जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला होता. पवार हे निवडणूक रिंगणात दुसऱ्यांदा होते. त्यांना वर्षभरापूर्वीच ‘तयारीला लागा’, असा स्पष्ट संदेशही देण्यात आला होता. त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंत्रणा लावली. मतदारसंघात त्यांनी स्वत: दौरे केले. पण मतदारांपर्यंत पोहोचण्यात त्यांची यंत्रणा कमी पडल्याचे दिसून आले. या मतदारसंघात काँग्रेसचे आसगावकर व विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांच्यातच लढत झाल्याचे दिसून येत आहे. सावंत यांनाही या वेळेस फटका बसला. त्यांची भिस्त रयत संस्थेच्या मतदारांवर होती.‘एक नंबरला मीच अन् दोन नंबरलाही मीच’, हा त्यांचा आकलनापलीकडचा आत्मविश्वास अचाटच ठरला. केवळ पुरस्कार वाटून आमदार होता येत नसते, हाही संदेश शिक्षकांनी दिला. महाविकास आघाडीमुळे गृहराज्य मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम यांच्या शिक्षण संस्थांचेही पाठबळ गेले. शिक्षक कृती समिती मतांतरामुळेही परिणाम झाला.

पदवीधर मतदारसंघात चार वेळा भाजपचे वर्चस्व होते. गेल्या वेळेसच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सारंग पाटील, अरुण लाड यांच्यात लढत झाली. लाड यांची बंडखोरी चंद्रकांतदादांना फायदेशीर ठरली. या निवडणुकीतच भाजपला धोक्याचा इशारा होता. किंगमेकर म्हणून असलेले चंद्रकांतदादा यांनाही हा आत्मविश्वास घातकी ठरल्याचे दिसून येत आहे. या वेळेस लाड यांनी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली तरी महाविकास आघाडीच्या एकजुटीचा त्यांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार, सतेज पाटील यांनी प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यात दौरे केले. याचा चांगला परिणाम झाल्याचे मतदानावरून दिसून आले.

-

कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा.. शिंदेंचे व्याहीप्रेम!

लाड यांच्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात मोठी यंत्रणा लावली. तीन दिवस ते सोलापूर शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामास होते. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व एमआयएमच्या नेत्यांना त्यांनी एकाच व्यासपीठावर आणले. सर्व शिक्षण संस्थांमधील प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. आमदार शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांची मुलगी अरुण लाड यांची सून आहे. एकीकडे काही स्थानिक नेत्यांच्या रुसवाफुगव्यात महाआघाडी अडकलेली असताना आमदार शिंदे यांनी लावलेली शिस्तबद्ध यंत्रणा स्ट्राँग ठरली. ‘पक्षनिष्ठे’पेक्षाही ‘व्याहीप्रेम’अधिक फायद्याचे ठरले.

Web Title: Sawant and Pawar lost confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.