उस्मानाबादमध्ये सावंतांचा शिवसेनेला दणका; सोलापूरच्या शिवसैनिकांमध्ये उडाला भडका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:27 AM2020-01-09T11:27:20+5:302020-01-09T11:29:24+5:30

उस्मानाबाद / सोलापूर : राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्टÑवादीचे सरकार आहे. हेच समीकरण उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आकारास येत ...

Sawant's Shiv Sena hits Osmanabad; Shiv Senais of Solapur exploded! | उस्मानाबादमध्ये सावंतांचा शिवसेनेला दणका; सोलापूरच्या शिवसैनिकांमध्ये उडाला भडका !

उस्मानाबादमध्ये सावंतांचा शिवसेनेला दणका; सोलापूरच्या शिवसैनिकांमध्ये उडाला भडका !

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीचे सरकारसात सदस्यांनी भाजपा समर्थक उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी केली३० विरूद्ध २३ अशा फरकाने शिवसेनेचे अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला

उस्मानाबाद / सोलापूर : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीचे सरकार आहे. हेच समीकरण उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आकारास येत असतानाच बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला धक्का बसला. शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या सात सदस्यांनी भाजपा समर्थक उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी केली. त्यामुळे ३० विरूद्ध २३ अशा फरकाने शिवसेनेचे अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. या बदल्यात आ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उपाध्यक्ष पदाची ‘लॉटरी’ लागली. मात्र यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील विशेषत: स्थानिक स्वाराज्य संस्थांतील राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्याचाच प्रत्यय बुधवारी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी आला. जिल्हा परिषदेत राष्टÑवादीच्या तिकीटावर निवडून आलेले सुमारे २६ सदस्य आहेत. तर काँग्रेस तेरा, शिवसेना दहा आणि भाजपाचे चार सदस्य आहेत. जिल्हा परिषदेतील सत्तेची सूत्रे आपल्याच हाती ठेवण्यासाठी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जोरदार फिल्डींग लावली होती. माजी आमदार राहुल मोटे यांच्या सहा सदस्यांनी आपल्याला साथ मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती.

त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आ. पाटील यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु, राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातल्याने राहुल मोटे यांची पंचाईत झाली होती. इच्छा नसतानाही महाविकास आघाडीतील शिवसेनेसोबत जाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली. महाविकास आघाडीची सत्ता स्थापण्याचा निर्णय झाल्यानंतर मंगळवारी तीनही पक्षाचे २९ सदस्य व स्थानिक नेते सोलापुरात एकत्र जमले. 

या ठिकाणी पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार होता. परंतु, त्यावर बुधवारी पहाटेपर्यंत निर्णय झाला नाही. दरम्यान, राहुल मोटे आपल्यासोबत येणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाकडून सावंत गट आपल्याकडे घेण्यासाठी गळ टाकण्यात आला. आणि या गळाला अख्खा सावंत गट लागला.

पदाचा फॉर्म्युला निश्चित होताच, आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आपल्या गटाचे सदस्य घेऊन उस्मानाबाद येथील ‘तेरणा’ गाठले. यानंतर काही पदाधिकाºयांनी येऊन उमेदवारी अर्ज नेले. उमेदवारी दाखल करण्यास सुरूवात होताच भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर आणि आ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत एकाच गाडीतून जिल्हा परिषदेच्या आवारात दाखल झाले. आणि शिवसेनेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. 

त्यानुसार अध्यक्ष पदाच्या उमेदवार अस्मिता कांबळे यांना राष्टÑवादीतील भाजप समर्थक १७ सदस्य, भाजप ४, अपक्ष १, काँग्रेस १ आणि सेनेच्या सात सदस्यांनी (सावंत गटाचे पाच आणि आमदार चौगुले गटाचे दोन) मतदान केले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अंजली शेरखाने यांना राष्टÑवादीचे नऊ, काँग्रेसचे बारा आणि सेनेच्या दोन सदस्यांनी मतदान केले. भूम तालुक्यातील सेनेच्या सदस्या कांबळे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ३० विरूद्ध २३ अशा फरकाने अस्मिता कांबळे अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. 

यानंतर उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले. त्यात आ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना भाजप समर्थक राष्टÑवादीचे १७, भाजप चार, अपक्ष, काँग्रेस प्रत्येकी एक तर        सेनेची सात मते मिळाली. तर      दुसरीकडे महाविकास आघाडीचे प्रकाश आष्टे यांना २३ मते पडली. यात राष्टÑवादी नऊ, काँग्रेस बारा आणि शिवसेनेच्या दोन मतांचा समावेश आहे. त्यामुळे सावंत हे प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा सात मते अधिक घेऊन विजयी झाले. 

... तर सोलापुरात सावंतांचा पुतळा जाळू : बरडे

  • - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश डावलून शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपला साथ दिली. यावरून जिल्ह्यातील शिवसैनिक सावंत यांच्यावर संतापले आहेत. पक्ष गद्दाराचा बंदोबस्त करेल. सोलापुरात त्यांचे पुतळे जाळले जातील, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. 
  • - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात डॉ. तानाजी सावंत यांना स्थान मिळाले नाही. त्यावरून सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर वाद घातल्याची चर्चा होती. आता उस्मानाबाद झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी भाजपला मदत केली. हा सेनेला झटका मानला जात आहे. 
  • - याबद्दल सेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तानाजी सावंत यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या आल्या. ही माहिती त्यांनीच पसरवली होती. आज उस्मानाबादची घटना ताजी आहे. या दोन्ही गोष्टी पाहता माझ्यासारखा ३३ वर्षांचा निष्ठावंत शिवसैनिक सावंत यांचे कृत्य, त्यांचं वागणं, बोलणं हे कदापि सहन करून घेणार नाही. ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा अपमान करणार असेल तर त्यांचे पुतळे आम्ही जाळू. तानाजी सावंत यांच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. 

विकासाच्या बाबतीत जिल्हा आजही खूप मागे आहे. याअनुषंगाने येणाºया काळात आमदार तानाजी सावंत, आ. राणा पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. बंडखोरी वगैरे काहीही नसून, आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत़
-धनंजय सावंत,
उपाध्यक्ष, जि.प., उस्मानाबाद.

मंत्रिपद न दिल्याने तानाजी सावंत यांचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाही. एवढंच या कृतीतून दिसतंय. उस्मानाबादेतील कृत्य ही उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी आहे. हा पक्षाशी द्रोह आहे. अशा गद्दाराचा पक्षाने लवकर बंदोबस्त करावा. 
- धनंजय डिकोळे, माजी जिल्हाप्रमुख 

आम्ही पक्ष वाढविताना अनेक गुन्हे अंगावर घेतले. चौकटीत राहून पक्ष वाढविला. कोण कितीही मोठा असला तरी तो शिवसेनेपेक्षा मोठा नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. पक्षशिस्त मोडणाºयाचा बंदोबस्त होईलच. 
- प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख

Web Title: Sawant's Shiv Sena hits Osmanabad; Shiv Senais of Solapur exploded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.