वेळापत्रक जाहीर; उद्यापासून रद्द झालेल्या रेल्वे आरक्षण तिकिटाची रक्कम मिळणार
By appasaheb.patil | Published: May 25, 2020 05:17 PM2020-05-25T17:17:25+5:302020-05-25T17:20:42+5:30
मध्य रेल्वे; गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बनविले वेळापत्रक
सोलापूर : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले़ यामुळे भारतीय रेल्वे प्रशासनाने यात्री, मेल, एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या होत्या़ त्याचप्रमाणे आरक्षण केंद्र सुद्धा बंद करण्यात आले होते. ज्या प्रवाशांनी आरक्षित तिकीट खरेदी केले होते, त्या प्रवाशांना तिकीट रद्द करून त्या तिकीटाची रक्कम परत करण्यास आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
दरम्यान, लॉकडाऊन काळात फिजिकल डिस्टन्सची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक बनविले आहे़ अपेक्षित गर्दीच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी २६ मे पासून आरक्षण खिडकीवर (पीआरएस) काउंटरवर परतावा देण्याचे वेळापत्रक ठरविले आहे. २२ मार्च ते ३० जून २०२० याच कालावधीत आरक्षित केलेल्या तिकीटांची रक्कम मिळणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
२३ ते ३१ मार्च पर्यंत तिकीट काढलेल्या प्रवाशांच्या तिकीटाची रक्कम २६ मे २०२० पासून देण्यात येणार आहे. १ ते १४ एप्रिल पर्यंतच्या तिकीटाचे पैसे १ जून २०२० रोजी पासून मिळणार, १५ ते ३० एप्रिल पर्यंतच्या तिकिटाचे पैसे ७ जून २०२० पासून मिळणार, १ मे ते १५ मे पर्यंत काढलेल्या तिकीटाचे पैसे १४ जूनपासून मिळणार, १६ ते ३१ मे पर्यंतच्या प्रवाशांना २१ जून आणि १ जून ते ३० जून पर्यंतच्या प्रवाशांचा तिकीट परतावा २८ जून पासून देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. कोविड -१ च्या नियंत्रणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कठोर पालन करण्याचे निर्देश सर्वांना देण्यात आले आहेत. काउंटरवर होणारी गर्दी पाहता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ पोलीसांचे पथक तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, तरी आरक्षित तिकीट घेतलेल्या प्रवाशांनी आपल्या जवळचे तिकीट रद्द करून त्या तिकीटांची रक्कम वेळापत्रकानुसार घेऊन जावावी असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.