साता समुद्रा पार! डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:55 AM2021-04-20T05:55:17+5:302021-04-20T05:55:50+5:30
ranjitsinh disale Scholarship in Italy: डिसले गुरुजींची गुणवत्ता, शिक्षण प्रसाराविषयी आस्था लक्षात घेऊन इटली सरकारने त्यांच्या नावे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्लोबल टीचर अवार्ड पुरस्काराने महाराष्ट्राच्या ग्रामीण गुणवत्तेची पताका आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकविणाऱ्या रणजितसिंह डिसले यांच्या नावाने आता थेट इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या पुरस्कारातील काही रक्कम त्यांनी इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांना दिली होती. त्या रकमेतून इटलीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ४०० युरोची (३६ हजार रुपये) स्कॉलरशीप देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
डिसले गुरुजींची गुणवत्ता, शिक्षण प्रसाराविषयी आस्था लक्षात घेऊन इटली सरकारने त्यांच्या नावे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले रणजितसिंह डिसले यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर २०२०मध्ये सात कोटींचा ग्लोबल टीचर ॲवार्ड जिंकला. मात्र, हा पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी पुरस्काराची एवढी मोठी रक्कम शिक्षण प्रसारासाठीच वापरण्याची घोषणा केली. त्यासाठी अर्धी रक्कम म्हणजे साडेतीन कोटी अंतिम फेरीतील अन्य नऊ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार अंतिम फेरीतील इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांनाही रक्कम देण्यात आली. आता इटलीतील सॅमनिटे सरकार मझोने यांना मिळालेल्या रकमेतून इटलीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ४०० युरोची (३६ हजार रुपये) स्कॉलरशीप देणार आहे.
सॅमनिटे राज्यातील विद्यापीठ स्तरावर दहा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल. १० वर्षे १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. इटलीतील बेनव्हेन्टो शहराचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांची निवड करणार आहेत. ‘कार्लो मझोने - रणजित डिसले स्कॉलरशीप’ असे या शिष्यवृत्ती योजनेचे इटली सरकारने नामकरण केले आहे.
जगभरातील गरजू मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून या शिष्यवृत्तीकडे पाहता येईल. इटलीतील ही मुले भारतीय शिक्षण व्यवस्थेत देखील आपले योगदान देतील, असा विश्वास वाटतो. भविष्यात या मुलांना भारतीय संस्कृती, भाषा यांचे शिक्षण देऊन परदेशात देखील भारतीय संस्कृतीचा प्रसार केला जाईल.
- रणजितसिंह डिसले, शिक्षक