जात पडताळणी नसणाºया ९७० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:11 AM2019-04-29T10:11:37+5:302019-04-29T10:14:28+5:30
प्रणिती शिंदे यांची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून दिले निवेदन
सोलापूर : विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने राज्यातील ९७0 अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द न करता त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी राज्याचे शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांच्याकडे मुंबई येथे केली. याप्रकरणी विद्यार्थ्यांची बाजू न्यायालयात सरकारकडून मांडण्यात आली असून त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित न ठेवण्याची भूमिका घेण्यात येईल असे आश्वासन तावडे यांनी दिले.
उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊनच शिक्षणाची कास धरतात; मात्र यंदा तंत्रशिक्षण संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने ९७0 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने ३१ आॅगस्ट २0१८ रोजी परिपत्रक काढले. त्यानुसार ३१आॅगस्ट २0१८ नंतर जातवैधता प्रमाणपत्र जमा न केलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात न घेताच ही कारवाई करण्यात आली. केवळ अभियांत्रिकीच नाही तर औषधनिर्माण शास्त्र, वास्तूशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, एम.आर्च, एम.ई. थेट व्दितीय वर्ष प्रवेश अशा सर्वच विद्यार्थ्यांवर जे जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करू शकलेले नाहीत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, अशी भूमिका आ. शिंदे यांनी घेतली.
ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज सादर केला होता, त्यांना गुणवत्तेने इतर प्रवर्गातून प्रवेश मिळाला असेल तर अशा विद्यार्थ्यांना जात वैधता व आवश्यकतेनुसार क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केले नसले तरी त्यांचे प्रवेश कॅटेगरी कन्व्हर्शन शुल्क रक्कम दोनशे रुपये आकारून त्या त्या प्रवर्गातून बदल करण्याची मुभा मिळाली आहे; मात्र ३0 आॅगस्टपर्यंत ज्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करू शकलेले नाहीत त्यांना मात्र पुढील शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. विद्यार्थीहित लक्षात घेता या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी आ. शिंदे यांनी केली.
लवकरच निर्णय - तावडे
- यासंदर्भात विनोद तावडे यांनी सांगितले की, राज्य सरकारने या विद्यार्थ्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. पंधरा दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. ९७0 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत तसेच त्यांना शिष्यवृत्तीही मिळेल.यावेळी गणेश डोंगरे, ऐश्वर्या बिंगी, प्रणाली गुजर, कीर्ती पोतदार, आफरीद शेख, संदीप दुस्सा आदीसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.