सोलापुरातील शाळांची घंटा वाजणार; मंगळवारपासून वर्ग, मैदानं बहरणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 05:07 PM2021-08-11T17:07:16+5:302021-08-11T17:07:50+5:30
शासनाच्या मार्गदर्शक सूचना : आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार समिती गठित
सोलापूर : शहरातील ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने मंगळवारी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात सोलापूर शहराचा समावेश होत असून, महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेली समिती यावर निर्णय घेणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी सहसचिव राजेंद्र पवार यांनी शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. शहरात ८ वी ते १२ वही तर ग्रामीण भागात ५ वी ते ७ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. पण शाळा सुरू करण्यासाठी संबंधित भागातील कोरोनाची परिस्थिती एक महिना कमी झालेली असावी अशी अट ठेवण्यात आली आहे.
२ ऑगस्ट रोजी ब्रेक द चेनमधील सुधारित सूचनांनुसार सोलापूरसह ११ जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. महाापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. यात झोन अधिकारी, आरोग्य व प्रशासन अधिकारी सदस्य असतील. नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. यात जिल्हा परिषद, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी व शिक्षणाधिकारी सदस्य असतील.
ग्रामीणमध्ये कामकाज सुरू
ऑनलाईन शिक्षण प्रभावी ठरत नसल्याने कोरोनामुक्त गावात झाडाखाली शाळा भरविण्यात येत आहेत. शहरातील शाळा मात्र पूर्णत: बंद आहेत. शहरात गेल्या एक महिन्यापासून संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे शहरात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगण्यात आले.