सोलापुरातील स्कुल बस बंद; मुलांच्या शाळेसाठी, पालकांच्या वाढल्या चकरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:55 PM2021-10-27T17:55:00+5:302021-10-27T17:55:07+5:30
पालकांची धावपळ : स्कूल बसचालकांची उपासमार
सोलापूर : कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण शाळा सुरू झाल्यानंतर मात्र पालकांवर ताण वाढू लागला आहे. कारण स्कूल बस बंद असल्यामुळे पाल्याला ने आण करण्याची जबाबदारी पालकांवर पडली आहे. शाळा विद्यार्थ्यांची जरी सुरू असली तरी पालकांना मात्र शाळेच्या चकरा दररोज माराव्या लागत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने मुले घरातच होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शाळा सुरू करण्यात आल्या. पण शाळा जरी सुरू असल्या तरी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसवर वाहतुकीसाठी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. विद्यार्थी वाहतूक करताना एका सीटवर एकच विद्यार्थी असला पाहिजे, असे अनेक नियम असल्याने स्कूल बसचालक आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे स्कूल बसला पूर्वीसारखेच विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी स्कूलबस चालकांकडून मागणी होत आहे.
- शहरातील एकूण शाळा - १५६
- सुरू असलेल्या शाळा- १५६
विद्यार्थी संख्या
- पाचवी- ७७१९७
- सहावी - ७६४२०
- सातवी- ७६२६७
- आठवी ७४६४३
- नववी ७६५७६
- दहावी ७१०५०
शाळा सुरू असल्याने मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची मोठी ओढाताण होत असताना दिसून येत आहे. पण कोरोनाचा संसर्गामुळे मुलांना स्वतः शाळेत आणून सोडणे व घेऊन जाणे गरजेचे आहे. पण सोबतच स्कूल बसचालकांचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
- उज्ज्वला साळुंके, मुख्याध्यापिका
बहुतांशी पालक सकाळी कामाला जातात. मुलांची शाळाही सकाळी असल्यामुळे त्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची अडचण होत आहे. तसेच सध्या सोलापुरातील परिवहन व्यवस्थेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे त्यांना पालकांनाच शाळेत सोडावे लागत आहे.
श्याम पाटील, पालक
पालकांची होणारी ओढाताण लक्षात घेता, स्कूलबस चालवण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी मिळणे गरजेचे आहे. प्रवास करताना सुरक्षिततेसाठी प्रत्येक विद्यार्थी मास्क इतर सर्व साहित्यांचा वापर आवश्यक करेल. यामुळे शासनाने विविध लवकर विचार करावा.
- पांडुरंग व्हनखडे, पालक