स्कूल बसचे दर जैसे थे; तुर्तास जूनपर्यंत पालकांना दिलासा
By दिपक दुपारगुडे | Published: April 4, 2023 02:50 PM2023-04-04T14:50:10+5:302023-04-04T14:50:53+5:30
राज्यात ४४ हजार स्कूल बस
सोलापूर : १ एप्रिलपासून स्कूल बस असोसिएशनने १५ ते २० टक्के भाडेवाढ हा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील अनेक मेट्रो शहरात स्कूल बसचे दर वाढले आहेत. मात्र, राज्यातील अनेक शहरांत दर वाढलेले आहेत. सोलापुरात मात्र ‘जैसे थे’ अशी स्थिती आहे असे शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे सांगण्यात आले. गेल्या वर्षी असोसिएशनने शालेय बसच्या शुल्कात ३० टक्के वाढ केली होती. कोरोना कालावधीत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे कारण देऊन थेट ३० टक्के शुल्क वाढवण्यात आले होते.
यंदा पुन्हा २० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला होता. त्यानुसार रेणके मेट्रो शहरात दरवाढ झालेली आहे. सध्या सोलापुरातील पालकांना दिलासा असला तरी येत्या जूनपासून स्कूल बसच्या दरात वाढ केली जाणार असल्याचेदेखील सांगण्यात आले.
राज्यात साधारणपणे ४४ हजार स्कूल बस असून सोलापुरात ७८५ स्कूल बस आहेत. इंधनाचे दर वाढले आहेत. यासोबतच बसशी संबंधित साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. अशा स्थितीत नवीन बसचे दरही वाढले आहेत. मिनी बसची किंमत २१ लाख रुपये असून, नवीन बसची किंमत २८ लाख रुपये आहे, तसेच सुटे भाग, बॅटरी इत्यादी बसशी संबंधित इतर वस्तूंच्या किमतीत १२-१८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असल्याचे स्कूल बस असोसिएशनचे म्हणणे आहे.
सध्याचे दर
साधारणपणे एका विद्यार्थ्याच्या घरापासून ते शाळेपासूनच्या अंतरावर किमान दर निश्चित केला जातो. सोलापुरातील स्कूल बस १५०० ते २२०० प्रतिविद्यार्थी हे सध्या किमान शुल्क आहे. जूनपासून १५-२० टक्के वाढ झाल्यानंतर प्रतिविद्यार्थी १७२५ ते २७०० असे शुल्क राहणार आहे. स्कूल बसच्या दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
महागाईमुळे सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, राज्यभरात दर वाढलेले असले तरी, सोलापुरात सध्या दर ‘जैसे थे’ आहेत, जूनपासून दरवाढ केली जाऊ शकते.
संतोष जाधव,
शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटना