मोहोळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेनं दिलं शौचालयाला एसटी बसचं रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:46 AM2019-01-22T10:46:38+5:302019-01-22T10:48:45+5:30
सोलापूर : स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेंंतर्गत सोलापूर जिल्ह्यात शालेय, अंगणवाडी आणि वैयक्तिक शौचालय कल्पकतेने रंगवून त्यावर स्वच्छतेचे संदेश देण्याचे ...
सोलापूर : स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेंंतर्गत सोलापूर जिल्ह्यात शालेय, अंगणवाडी आणि वैयक्तिक शौचालय कल्पकतेने रंगवून त्यावर स्वच्छतेचे संदेश देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मधील शौचालयास रंगरंगोटीत एसटी बसचा आकार देण्यात आला असून, स्वच्छता एक्स्प्रेस असे नामकरण करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या पेयजल विभागाच्या वतीने ३१ जानेवारीपर्यंत देशात स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शौचालयावर रंगरंगोटी करून त्यावर शौचालय वापरण्याबाबतचे महत्त्व पटविणारी विविध चित्रे काढण्यात येत आहेत. यामध्ये प्लास्टिक बंदी , शौचालयाचा वापर, पिण्याच्या पाण्याचे महत्त्व, पाणी गुणवत्ता, लहान मुलांना आकर्षित करणाºया चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील तावशी , शेवते , मेंढापूर व गोपाळपूर, मंगळवेढा तालुक्यातील देगाव, मल्लेवाडी, उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी, करमाळा तालुक्यातील सरपडोह , माळशिरस तालुक्यातील मांडवे या ठिकाणी शौचालये रंगविण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी गावातील शौचालय रंगविण्यास गती देऊन पाणी व शेतीविषयक चित्रांना प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यामध्ये सर्व शाळांनी आघाडी घेतली असून, शालेय स्वच्छता करण्यात येत आहे. शालेय स्वच्छतेबरोबरच अंगणवाडी शौचालयेदेखील रंगविण्यात येत आहेत. मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयावर एसटी बसचे चित्र रंगविण्यात आले आहे.
ग्रामसेवकांचा होणार गौरव
स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाºया ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर २८ जानेवारी रोजी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. या स्पर्धेसाठी शाळा, लोक व ग्रामपंचायती पुढे येत आहेत़ यातून स्वच्छतेबरोबरच पाण्याचे महत्त्व व प्लास्टिकचे दुष्परिणाम मांडण्यात येत आहेत. स्वच्छ व सुंदर शाळा व अंगणवाडी करणाºया कर्मचाºयांनाही विशेष सन्मानपत्र देण्यात येणार आहे. हे काम लोकसहभाग निधीतून होत असल्याबाबत भारूड यांनी समाधान व्यक्त केले.