सोलापूर जिल्ह्यातील शालेय मुलांना यंदा दोन मेपासून उन्हाळी सुट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 04:55 PM2022-04-13T16:55:31+5:302022-04-13T16:55:34+5:30
शिक्षण विभागाचे आदेश ; १३ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी शाळा या पूर्णवेळ भरवण्यात येत आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शैक्षणिक वेळापत्रकात मोठे बदल झाले आहेत. यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून दरवर्षीप्रमाणे एकवाक्यता व सुसंगत आणण्यासाठी यंदा उन्हाळी सुट्या २ मे पासून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.
सध्या पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्णक्षमतेने भरविण्यात येत आहेत. या वर्गाच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. पूर्वी या परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येत होते. यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी जास्त मिळत होते. पण यंदा या शाळा ३० एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे यंदा परीक्षा तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात होतील आणि त्यानंतर १ मे रोजी या परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचे सूचना देण्यात आले आहेत. आणि २ मे ते १२ जूनपर्यंत उन्हाळी सुट्या असणार आहे.
१३ जूनपासून शाळा होणार सुरू
विद्यार्थ्यांना २ मे ते १२ जून दरम्यान उन्हाळ्याच्या सुटी असणार आहेत. १३ जूनपासून राज्यात सर्वत्र शाळा सुरू करण्यात येणार आहे. पण विदर्भातील तापमान लक्षात घेता उन्हाळ्याची सुटी तेथील विद्यार्थ्यांना रविवार, दि. २६ जूनपर्यंत असणार आहेत आणि सोमवार, दि. २७ जूनपासून त्यांच्या शाळा सुरू होतील, असे आदेशात म्हटले आहे.
माध्यमिक शाळा संहितांतर्गत शैक्षणिक वर्षातील एक वर्षात एकूण ७६ सुट्या असतात. यंदा या सुट्या कमी मिळाल्यामुळे या सुट्या गणेशोत्सव अगर नाताळ या सणाच्याप्रसंगी समायोजन जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने करण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा घेण्यात यावे. एक मे ला परीक्षांचा निकाल जाहीर करावा, असे सांगण्यात आले आहे. पण दोन आठवड्यामध्ये परीक्षा घेऊन निकाल लावणे कसे शक्य आहे? असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.