लस घेण्यासाठी ज्येष्ठांनी भरले शाळेचे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:49+5:302021-06-01T04:16:49+5:30

पंढरपूर शहरात लसीकरण केंद्रामध्ये लस घेण्यासाठी शेकडो नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मला लवकरात लवकर लस मिळावी, या उद्देशाने ...

School classes filled with seniors to get vaccinated | लस घेण्यासाठी ज्येष्ठांनी भरले शाळेचे वर्ग

लस घेण्यासाठी ज्येष्ठांनी भरले शाळेचे वर्ग

Next

पंढरपूर शहरात लसीकरण केंद्रामध्ये लस घेण्यासाठी शेकडो नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मला लवकरात लवकर लस मिळावी, या उद्देशाने नागरिक पहाटेपासूनच रांग लावून थांबत होते. यामुळे पंढरपूर नगर परिषदेने टोकन पद्धतीने लसीकरण सुरू केले आहे. नागरिकाचा ज्या दिवशी कोविड-१९ लसीकरणाचा नंबर येईल, त्याच्या एक दिवस अगोदर नागरिकांच्या मोबाइल नंबरवर पंढरपूर नगर परिषदेमार्फत संदेश दिला जात आहे. त्या संदेशामध्ये नागरिकाचे नाव, कोविड-१९ लसीकरणाचा दिनांक व वेळ नमूद आहे. त्यानुसारच नागरिकांनी लस घेण्यासाठी आपले टोकन आणि आधारकार्ड सोबत घेऊन मनीषानगर येथील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये हजर राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.

अरिहंत पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डॉ. शीतल शहा, सचिव उज्ज्वल दोशी, प्राचार्या सुप्रिया बहिरट, प्राचार्या पद्मजा लोखंडे यांनी शाळेतील वर्गामध्ये लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची बसण्याची सोय केली आहे. त्या ठिकाणी संबंधित नागरिकांचे ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम शाळेतील शिक्षक व नगर परिषदेचे कर्मचारी करत आहेत. त्याचबरोबर शाळेच्या गेटसमोर मंडप बांधण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्याचे काम होत आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे लसीकरण केंद्रावर भेट देत आहेत.

दोन दिवसांत ७५० ज्येष्ठांचे लसीकरण

मागील दोन दिवसांमध्ये १८०० च्या आसपास ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. लसी कमी प्रमाणात येत असून, मागील दोन दिवसांमध्ये ७५० च्या आसपास ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. उर्वरित ज्येष्ठ नागरिकांना पुढील दोन-चार दिवसांत लस देण्यात येणार असल्याचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले.

लसीकरणासाठीची नोंदणी केंद्रे

लसीकरण नोंदणीसाठी नाथ चौक कवठेकर प्रशाला, आदर्श प्राथमिक विद्यालय, द.ह. कवठेकर प्रशाला, कर्मयोगी विद्यानिकेतन आदी ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारली असून, प्रत्येक केंद्रावर ३०० जणांची नोंदणी केली जात आहे.

फोटो ::::::::::::::::::::::::

अरिहंत पब्लिक स्कूलमधील वर्गात लस घेण्यासाठी बसलेले ज्येष्ठ नागरिक. (छाया : सचिन कांबळे)

Web Title: School classes filled with seniors to get vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.