सोलापूर गारमेंट उद्योगाला बसला शाळा बंदचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:58 AM2021-04-04T04:58:20+5:302021-04-04T04:58:38+5:30
कोट्यवधींची उलाढाल ठप्प, २० हजार कामगारांवर कुऱ्हाड
सोलापूर : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद आहेत. याचा सर्वाधिक फटका सोलापुरातील गारमेंट उद्योजकांना बसतोय. शाळा बंद असल्याने मागच्या वर्षी ५० टक्के गारमेंट कारखाने बंद पडले होते. चालू वर्षातदेखील शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे देशभरातून गणवेशासाठी येणाऱ्या ऑर्डर बंद झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित ५० टक्के कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
शाळा सुरू न झाल्यास सोलापूर गारमेंट उद्योगाची वाटचाल शून्य मार्केटकडे निश्चित असणार आहे. यामुळे गारमेंट उद्योगातील २० हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल, अशी माहिती सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सहसचिव प्रकाश पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे येथील गारमेंट उद्योजक मार्केटिंगसाठी मागील वर्षभरापासून बाहेर पडलाच नाही. त्यामुळे नवीन ऑर्डर्स त्यांच्या हाती नाहीत. शाळा सुरू होतील, या आशेवर काही गारमेंट उद्योजकांनी तयार करून ठेवलेले शालेय गणवेश पडून आहेत. त्यामुळे गुंतवणुकीकरिता भांडवल नाही, नवीन ऑर्डर्स नाहीत अशी अवस्था येथील लघु उद्योजकांची आहे. मागील वर्षी जवळपास १५० गारमेंट्स युनिट बंद राहिले. सध्या १०० ते १५० युनिट सुरू आहेत. यातील ५० युनिट्स कधीही बंद पडू शकतात, अशी स्थिती आहे.
गणवेश सीझन संपुष्टात
महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. त्यामुळे बाहेरचा व्यापारी महाराष्ट्रात येत नाही. दुसरी बाब म्हणजे परप्रांतात जाण्याकरिता जाचक अटी आहेत. त्यामुळे सोलापुरातला व्यापारीही बाहेर जाणे शक्य नाही. यंदाही हंगाम चालेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सलग दोन वर्षे व्यवसाय ठप्प असल्याने उद्योजक आर्थिक खाईत सापडले आहेत.
- प्रकाश पवार, सहसचिव, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन
आकडे बोलतात
नोंदणीकृत गारमेंट कारखानदार
३००
सध्या सुरू गारमेंट युनिट्स
१५०
एकूण कामगार
२०,०००
कोरोनापूर्वीची
युनिफॉर्म उलाढाल
४०० कोटी