नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी
By Appasaheb.patil | Updated: December 26, 2024 18:53 IST2024-12-26T18:51:51+5:302024-12-26T18:53:56+5:30
या घटनेमध्ये ३९ विद्यार्थी व ११ शिक्षक २ चालक होते. त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क, मंगळवेढा: नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या शाळेच्या सहल बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी होवून चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवेढापासून तीन किलोमीटर अंतरावर घडली. श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर माध्यमिक विद्यालयाची शाळेची खाजगी बस कोल्हापूर पर्यटनाला जात असताना पहाटे ३.३०च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खाजगी बसचा अपघात झाला. बस रस्त्याच्या खाली उतरली, दोन वेळा पलटी मारून रस्त्याच्या खाली खड्ड्यात पडली. या घटनेमध्ये ३९ विद्यार्थी व ११ शिक्षक २ चालक होते. त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर या विद्यालयाची माध्यमिक शाळेची सहल लातूर येथील खाजगी बस MH 24 AB 7281 ही ३९ विद्यार्थी व आठ शिक्षक यांना घेऊन रात्री १० वाजता कोल्हापूरकडे निघाली होती. सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या आनंदाने कोल्हापूरकडे निघाले असताना मंगळवेढा येथील लक्ष्मी मंदिर काळाखडकाच्या जवळ ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली जाऊन दोन वेळा पलटी झाली.
यामध्ये साखर झोपेमध्ये असणारे विद्यार्थी व शिक्षक यांना दुखापत झाली असून १०८ रूग्णवाहिकेचे डॉ. प्रज्योत पाटील व चालक गौसपाक आतार यांनी तातडीचे सहकार्य केले. १०८ अँम्बुलन्स सांगोला यांनाही जखमींची संख्या जास्त असल्यामुळे मदतीसाठी बोलवण्यात आले. त्यामध्ये डॉ. वैभव जांगळे व चालक दत्ता भोसले त्याचबरोबर हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांची अँम्बुलन्स १०३३चे ड्रायव्हर व सुपरवायझर यांनी तातडीची घटनास्थळ गाठून मदत कार्य करून जखमी विद्यार्थी, शिक्षक व दोन चालकांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील धाव घेऊन जखमींसाठी वैदयकिय यंत्रणा सतर्क ठेवत रात्र पाळीतील आर.बी.एस. के चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण माने, आयुष डॉ. निखिल जोशी, आर.बी. एस. के चे डॉ कुलकर्णी व परिचारिका वैशाली शिंदे, शितल कपाटे, सानिका गायकवाड सुनिता जाधव व चनशेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांवर उपचार केले. जखमी विद्यार्थी व शिक्षक यांची यांना उपचार केले असून त्यामध्ये दोन विद्यार्थी चालक यांना हाडाची दुखापत झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना जानकर यांनी दिली.