शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 05:36 PM2021-08-25T17:36:11+5:302021-08-25T17:36:18+5:30

शालेय शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांच्या भवितव्याची पालकांना चिंता

As the school was closed, the mental health of the children as well as the parents deteriorated! | शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले !

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले !

Next

सोलापूर : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. बहुतांशी मुलांच्या हाती लहान वयातच स्मार्ट फोन मिळाले. यामुळे अल्पवयीन मुलांना ही सोशल मीडियाची ओढ वाढत असून, परिणामी कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होत आहे, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली.

स्पर्धेच्या युगात आपला पाल्य इतरांपासून मागे तर पडणार नाही ना? या भीतीपोटी पालक मुलांवर पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने लक्ष ठेवत असून, प्रत्यक्ष शालेय शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना सातत्याने सतावत आहे. पालकांचे सगळे ऐकणारी मुले हातामध्ये मोबाइल पडल्यानंतर पालकांना उलटी उत्तरे देण्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या ही मुले लहान आहेत; पण भविष्यात या बाबींची त्यांना सवय लागून त्यांचा स्वभाव हा त्यांचा गुण-दोष ठरू शकतो. याच तणावातून पालकांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये भर पडत आहे. मुलांना त्यांच्यावरील बंधनांमध्ये अनावश्यक वाढ झाल्याची भावना निर्माण होऊन मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

मुलांच्या समस्या

ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासा- व्यतिरिक्त सोशल मीडियाची ओढ आणि ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले असून, परिणामी कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होत आहे. मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा वाढून चिडचिड वाढली आहे.

पालकांच्या समस्या

ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या स्पर्धेत पाल्य इतरांच्या तुलनेत मागे राहण्याची भीती पालकांमध्ये वाढीस लागली आहे. मुलांमध्ये डिप्रेशन, बेचैनी, चिंता विकार, संशयाचा आजाराचे प्रमाण पूर्वी पाच टक्के मुलांमध्ये आढळत होते. आता पंधरा टक्के मुलांमध्ये ही लक्षणे दिसत आहेत. यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात..

गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षक, शालेय मित्र व सभोवतालच्या वातावरणाशी संपर्क तुटला आहे. त्याचा परिणाम मुलांमध्ये डिप्रेशन, बैचेनी, चिंता विकार आजार वाढत आहेत. मुलांमध्ये मानसिक, भावनिक व सामाजिक भावना व्यक्त करता येत नाहीत. पालकांनी मुलांसोबत संवाद वाढविणे आवश्यक आहे. - डॉ. स्वाती गंगाधर कोरके, मानसोपचार तज्ज्ञ.

 

ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे त्यात फक्त एकतर्फी शिकविले जात आहे. यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्रास वाढला आहे. पालकांनी मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे.

- डॉ. शुभदा खंदारे, मेंदुरोगतज्ज्ञ

इयत्तानिहाय मुलांची संख्या

  • पहिली - ७०६०६
  • दुसरी - ७६१६७
  • तिसरी - ७६०९८
  • चौथी - ७७३११
  • पाचवी- ७७१९७
  • सहावी - ७६४२०
  • सातवी- ७६२६७
  • आठवी ७४६४३
  • नववी ७६५७६
  • दहावी ७१०५०

Web Title: As the school was closed, the mental health of the children as well as the parents deteriorated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.