कोरोना रुग्ण आढळताच सोलापुरातील शाळा सतर्क; पुन्हा तोंडावर मास्क, प्रवेशद्वारावर सॅनिटायर
By काशिनाथ वाघमारे | Published: March 16, 2023 06:37 PM2023-03-16T18:37:51+5:302023-03-16T18:39:12+5:30
सोमवारी घेण्यात आलेल्या रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये आठ रुग्ण कोरोनाने बाधीत आढळून आले.
सोलापूर - सोमवारी घेण्यात आलेल्या रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये आठ रुग्ण कोरोनाने बाधीत आढळून आले. यात तीन पुरुष आणि पाच महिला असून एका बाधीत महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर सोलापूर शहरातील शाळा, महाविद्यालयासह पालक- विद्यार्थी सतर्क झाले आहेत. गुरुवारी अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने मास्क घालून शाळेत प्रवेश करताना आढळून आले. काही शाळांनी सकाळी प्रार्थनेवेळी विद्यार्थ्यांना खबरदारीच्या सूचना केल्या.
शहरात कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले. शेळगीत कामगारांच्या मुलांसाठी ओळखली जाणाऱ्या एस.के. बिराजदार प्रशालेतील विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने मास्क घालून आले. याशिवाय आसरा परिसरातील सुरवसे प्रशाला, जुळे सोलापूरमधील वि.मो. मेहता प्रशाला आणि भारती विद्यापीठमधील अनेक विद्यार्थी सकाळी मास्क घालून प्रवेश करताना आढळून आले. एस.के. बिराजदार प्रशालेत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेली खबरदारी पाहून मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप बसवला.
रुग्णसंख्या २९ वर कॉन्टॅक्ट ट्रेसींग सुरू
बुधवारपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही १५ वर होती. ती आज २९ वर असून या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसींग सुरू केले असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी दिली. संबंधीतांच्या चाचण्या केल्या जात असून नई जिंदगी परिसरात स्वच्छता आणि औषध फवारणीच्या सूचना दिल्या आहेत. मागील कोरोना काळात लसीकरण झाल्याने २९ पैकी एकच रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. बाकी रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना होम आयसोलेशन केल्याचे लोहारे यांनी सांगितले.