Coronavirus; सोलापुरातील शाळा, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:47 AM2020-03-17T10:47:03+5:302020-03-17T10:53:00+5:30
अॅडमिट असलेल्या पाचपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह; सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन
सोलापूर : कोरोना साथीचा प्रतिबंध करण्यासाठी शहरातील शाळांबरोबर आता जिल्ह्यातील सर्व शाळा, जलतरण तलाव, चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवार, बुधवार बाजाराबाबत मात्र मंगळवारी निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोना साथीचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. शहरातील शाळा सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. आता जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर जलतरण तलाव, जिम ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंची विक्री असलेली दुकाने सुरूच राहतील, पण या ठिकाणी गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. आठवडा बाजारही बंद करावेत, अशी मागणी होत आहे. पण यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. मंगळवारी सर्व यंत्रणांशी चर्चा करून बाजाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नागरिकांनी गर्दी टाळावी
- पुणे, मुंबईकडून गावाकडे परतणाºयांचा लोंढा वाढला आहे. रेल्वेने किंवा इतर वाहनाने येणाºयांना प्रतिबंध करणे शक्य नसले तरी नागरिकांनी स्वत:हून गर्दी टाळण्याची बंधने पाळावीत. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. मेळावे, सभा, यात्रा, जत्रांना बंदी घातली आहे. याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी पोलिसांवर जबाबदारी दिली आहे. बंदी आदेश असतानाही शहरात कार्यक्रम झाल्याच्या तक्रारी आहेत, याबाबत खातरजमा करून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
शासकीय कार्यालयांनाही नियम
- सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महापालिकेत नागरिकांनी विविध कामांसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत किरकोळ कामासाठी शासकीय कार्यालयात येण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात येणारी निवेदने व तक्रारी टपाल किंवा ई-मेलमार्फत कराव्यात, असे सूचित केले आहे.