संस्कारांतील विज्ञान मुलांपर्यंत पोहोचावं : थोर शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी सोलापूरात व्यक्त केले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 09:40 AM2017-12-01T09:40:47+5:302017-12-01T09:44:44+5:30
महासंगणकाचे जनक, पद्मश्री, पद्मभूषण या भारत सरकारच्या नागरी सन्मानाचे विजेते...अतिशय विद्वान, जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून लौकिक...इतकी महानता लाभली असतानाही बोलण्यातील मृदुपणा अन् वागण्यातील विनयशीलता व सालसपणाने डॉ. विजय भटकर यांनी सर्वांनाच प्रभावित केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : महासंगणकाचे जनक, पद्मश्री, पद्मभूषण या भारत सरकारच्या नागरी सन्मानाचे विजेते...अतिशय विद्वान, जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून लौकिक...इतकी महानता लाभली असतानाही बोलण्यातील मृदुपणा अन् वागण्यातील विनयशीलता व सालसपणाने डॉ. विजय भटकर यांनी सर्वांनाच प्रभावित केले. डॉ. भटकर स्वागतासाठी आलेल्या मंडळींशी बोलले तेही विज्ञानाविषयी...मुलांना संस्कारित करण्याविषयी. संस्कार अन् अध्यात्मातील विज्ञान बालगोपाळांपर्यंत पोहोचण्याची गरज बोलून दाखविली.
डॉ. भटकरांचे गुरूवारी रात्री सोलापुरात आगमन झाले. ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ उद्या या महान शास्त्रज्ञाच्या उपस्थितीत होणार आहे. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या विश्रामगृहात मुक्कामाला आहेत. डॉ. भटकर सोलापुरात आल्याची वार्ता ज्यांना समजली, ती सारी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी हजर झाली. वस्तूत: ते प्रवासात थकून आले होते; पण चेहºयावर थकव्याचा लवलेशही नव्हता. प्रत्येकाकडून अत्यंत प्रेमाने पुष्पगुच्छ ते स्वीकारत होते...संवाद साधत होते. ‘लोकमत’ परिवारानेही त्यांचे स्वागत केले. केलेल्या संस्कारांच्या मोती या मोहिमेतील ‘टेक्नोचॅम्प’ या विशेष पानाचे डॉ. भटकर अतिथी संपादक होते. त्या साºया आठवणी त्यांनी सांगितल्या; पण त्यांच्या संवादावरून लहान मुलांना घडविण्याबाबतची त्यांची संवेदनशीलता दिसून आली. भारतीय अध्यात्मक आणि संस्कारांबाबत त्यांना अभिमान आणि आस्था असल्याचे जाणवले. ते म्हणाले. अध्यात्म आणि संस्कारांमध्ये विज्ञान आहेच. आपला प्रत्येक संस्कार विज्ञानाशीच निगडित आहे; पण मुलांपर्यंत संस्कार पोहोचविताना त्यांना त्यातील विज्ञानही कळाले पाहिजे, असे ते म्हणाले.