विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल
By admin | Published: June 21, 2014 12:59 AM2014-06-21T00:59:28+5:302014-06-21T00:59:28+5:30
महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
.
सोलापूर : इयत्ता १० वीच्या निकालानंतर सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत शहरातील विद्यार्थ्यांचा कल शास्त्र विभागाकडे सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे. अर्ज विक्री सुरू झाल्याने विविध महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
इयत्ता १० वीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर शहर-जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विविध महाविद्यालयांत प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. दयानंद कॉलेज आॅफ आर्ट अॅन्ड सायन्स महाविद्यालयात सकाळी १० वा. पासून विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कला विभागासाठी फक्त ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज घेतले. शास्त्र विभागात प्रवेश घेण्यासाठी ५२५ अर्जांची विक्री झाली आहे. डी.ए.व्ही.वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात प्रवेशासाठी ३८९ अर्जांची विक्री झाली आहे.
संगमेश्वर महाविद्यालयात कला विभागासाठी फक्त १२५ विद्यार्थ्यांनी अर्ज घेतले आहे. शास्त्र विभागासाठी १ हजार २२६ अर्जांची विक्री झाली आहे. तर वाणिज्य विभागासाठी ४१0 अर्जांची विक्री झाली आहे. वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात पहिल्याच दिवशी कला विभागासाठी १९८ अर्जांची विक्री झाली आहे. शास्त्र विभागासाठी १३00 अर्जांची विक्री झाली आहे. हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागासाठी ३५0 अर्जांची विक्री झाली आहे.
वास्तविक पाहता तिन्ही महाविद्यालयांत पूर्वी कला शाखेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अधिक होती मात्र यंदा यात मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. प्रवेश अर्ज विक्रीची मुदत दि.२0 ते ३0 जून दरम्यान असून पहिल्याच दिवशी शास्त्र शाखेसाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्जांची विक्री झाली आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम शास्त्र त्यानंतर वाणिज्य आणि कला विभागाला प्राधान्यक्रम दिल्याचे दिसून येत आहे.
----------------------
विद्यार्थ्यांची उत्सुकता
शालेय विश्वातून प्रथमच महाविद्यालयात जात असल्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता शिक्षकांची छडी आणि गणवेशापासून मुक्त होऊन कॉलेजची स्वप्न विद्यार्थी पहात आहेत. आपल्या आवडीचा पेहराव करून नवीन महाविद्यालयात कुतूहलाने बागडताना दिसत होते.
---------------------
मुलगा महाविद्यालयात जाणार, उच्च शिक्षण घेणार याचा अभिमान बाळगत अर्ज घेण्यासाठी पालकांची लगबग होती त्याच्याही रांगा होत्या.