रस्ते डागडुजीसाठी ऊस उत्पादकांच्या खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:12+5:302020-12-08T04:19:12+5:30
माळशिरस : सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. यातच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे ऊस वाहतूक ...
माळशिरस : सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. यातच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे ऊस वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. अखेर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चातून रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. यामुळे ऊस उत्पादकांना शेतातून ऊस बाहेर काढण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, साखर कारखाने व बांधकाम विभागाकडे खेटे घातले. मात्र सर्वत्र निधीचा ठणठणाट असल्यामुळे या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ऊस वाहतूक करण्यासाठी सर्रास ट्रॅक्टर, ट्रकचा वापर होत आहे. उसाच्या जड वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता असते, मात्र काही शेतकऱ्यांचा आडमुठेपणा व अतिवृष्टी यामुळे शेतशिवारातून जाणारे लहान-मोठे रस्ते धोकादायक बनले आहेत. याचा सर्वाधिक फटका ऊस वाहतुकीला बसत आहे. यासाठी अनेक शेतकरी संबंधित विभागाकडे निधीसाठी खेटे घालून थकले. अखेर शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातूनच रस्त्यांची डागडुजी करावी लागत आहे. नुकतीच भांबुर्डी येथील शेतकरी रामराव गोरड यांनी स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली आहे.
रस्ते अडविण्याची संकल्पना
ग्रामीण भागात वाड्या-वस्त्या, शेतशिवारांना रस्त्यांनी जोडण्यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या. मात्र काही शेतकरी आडमुठेपणाने वागत रस्ते अडविण्याचे धोरण राबवत आहेत. याकडे महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत कडक कायदे व कारवाई होण्याची गरज असल्याची चर्चा शेतकऱ्यांत होत आहे.
कोट :::::::::::::::::::::
रस्ता ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. यातच अलीकडच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. यामुळे रस्त्यांची आवश्यकता प्रत्येक शेतकऱ्याला भासत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीवेळी डागडुजीसाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे.
रामराव गोरड, ऊस उत्पादक शेतकरी, भांबुर्डी
फोटो :::::::::::::::::
भांबुर्डी येथील शेतकरी एकत्र येत रस्त्याची डागडुजी करत असल्याचे छायाचित्र.