भंगार विक्रेत्याने दिली करमाळा नगरपरिषदेला शववाहिकेसाठी चारचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:34+5:302021-06-05T04:16:34+5:30
करमाळा : कोरोना संसर्गाच्या काळात आपलीही मदत व्हावी, यादृष्टीने येथील भंगार साहित्याची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने आपली सुस्थितीत असणारी चारचाकी ...
करमाळा : कोरोना संसर्गाच्या काळात आपलीही मदत व्हावी, यादृष्टीने येथील भंगार साहित्याची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने आपली सुस्थितीत असणारी चारचाकी गाडी पालिकेला शववाहिकेसाठी दिली.
मे महिन्याच्या सुरुवातीस कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला होता. या काळात मृत्यूचे प्रमाणदेखील अधिक होते. माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार यांच्यात कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना होणारा त्रास याबाबतही चर्चा होती.
दरम्यान, येथील भंगाराचे व्यापारी पप्पू चव्हाण यांनी स्वत:ची चारचाकी गाडी शववाहिका म्हणून वापरायला देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी प्रत्यक्षात ती गाडी पालिकेच्या ताब्यात दिली. विशेष म्हणजे याचा कोठेही गाजावाजा केला नाही.
----
आमच्याकडे सर्वाधिक कॉल तक्रारी स्वरूपात येतात. त्यातूनही सुखद धक्का देणारा कॉल आला, ‘मॅडम, माझी गाडी उद्या तुमच्या ताब्यात देतो, कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरा...’ हा संवाद माणुसकी जागी करणारा जाणवला.
- वीणा पवार, मुख्याधिकारी, करमाळा नगरपरिषद
----
फोटो : ०३ पप्पू चव्हाण
पप्पू चव्हाण यांनी नगरपरिषदेला रुग्णवाहिका म्हणून मोफत दिलेली महिंद्रा जीप.