धावा केला, शिणवटा घालविला!

By admin | Published: July 2, 2017 04:04 AM2017-07-02T04:04:17+5:302017-07-02T04:04:17+5:30

आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी

Scratched, sprayed! | धावा केला, शिणवटा घालविला!

धावा केला, शिणवटा घालविला!

Next

शहाजी फुरडे-पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्क
तोंडले बोंडले (सोलापूर) : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी तोंडले-बोंडलेच्या उतारावर ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात धावा करून वारीतील चालण्याचा शीणवटा घालविला. रात्री सोहळा पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे विसावला.
संत तुकाराम महाराज सोहळा माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील मुक्काम आटोपून सकाळी ७ वाजता तोंडले-बोंडलेकडे मार्गस्थ झाला. माळखांबीमार्गे दुपारी बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराजांना विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता, अशी आख्यायिका आहे़ त्यामुळे दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांनी येथे धावा केला. सोहळा तोंडले-बोडले येथे दाखल झाला त्यावेळी माऊलीची पालखी तोंडले येथे दुपारच्या विश्रांतीसाठी थांबली होती़ तुकारामांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी माऊलीच्या रथाचे तर काही जणांनी गावात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले. याच दरम्यान संत सोपान काकांची पालखी ही माऊली व तुकोबांची वाट पाहत थांबली होती. तुकारामांचा सोहळा बोंडले येथे येताच संत सोपानकाका आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रथ एकमेकांजवळ आणण्यात आले़
दोघा संतांची भेट झाल्यानंतर पुंडलिक मोरे महाराज व नारायण गोसावी यांनी एकमेकांना मानाचे नारळ दिले. त्याबरोबरच संताजी महाराज जगनाडे यांनी ही तुकोबांची भेट घेतली. बोंडले येथून पुढे सोपानकाका त्यांच्या मागे तुकाराम महाराज पालखी सोहळा गेल्यानंतर तीन वाजता माऊलींची पालखी निघाली. या सोहळ्यातील वारकरी विठ्ठलाचे वास्तव्य असलेल्या पंढरपूर तालुक्यात जाणार असल्याने झपाझप पावले टाकत चालत होते.

भक्तांचा महापूर
बोंडले ते पिराची कुरोली फाटा दरम्यान दोन्ही पालखी सोहळे एकाच मार्गावरून चालत असल्याने सुमारे पाच ते सहा लाख वारकरी विठू नामाचा गजर करीत होते़ त्यामुळे हा टप्पा म्हणजे खऱ्या अर्थानं भक्तीचा महापूर आल्यासारखा दिसत होता.

Web Title: Scratched, sprayed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.