सांगोल्यात निर्धारित वेळेनंतरही दुकान चालू ठेवल्याने सील; मंगल कार्यालयासही दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:28+5:302021-05-21T04:23:28+5:30
सांगोला : कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असूनही अत्यावश्यक सेवेतील दुकान सकाळी ११ नंतरही चालू ठेवले. दुकानमालकाने ६० ते ७० ...
सांगोला : कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असूनही अत्यावश्यक सेवेतील दुकान सकाळी ११ नंतरही चालू ठेवले. दुकानमालकाने ६० ते ७० ग्राहकांना आत घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. या प्रकरणी तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या पथकाने दुकान सील केले, तर लग्नासाठी २५ पेक्षा जास्त लोक जमवल्याप्रकरणी कविराज मंगल कार्यालयाच्या मालकास सुमारे पाच हजार रुपयाचा दंड केला. ही कारवाई गुरुवारी सकाळी ११ ते १ या वेळेत सांगोला शहरात केली.
सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील आस्थापनेवगळता सर्व व्यवसाय, उद्योगधंदे बंद ठेवून लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकानदार सकाळी ७ ते ११ ही वेळ ठरवून दिली असतानाही वेळेनंतरही दुकाने चालू ठेवल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार सांगोला नगरपालिका महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकातील तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने गुरुवारी सांगोला वासूद रोड येथील कुटुंब सुपरमार्केट सकाळी ११ नंतरही चालू ठेवून ६० ते ७० ग्राहकांना आत घेऊन गर्दी केल्याचे दिसून आले. त्यानुसार हे दुकान सील केले. तसेच २५ पेक्षा जास्त लोकांना जमवून लग्नसमारंभ आयोजित केल्याने कविराज मंगल कार्यालयाच्या मालकास पाच हजार रुपयांचा दंड केला. याशिवाय आणखी चार दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड केल्याचे सांगण्यात आले.
फोटो ओळी
२०सांगोला०१
सांगोला वासूद रोडवरील कुटुंब सुपरमार्केट सकाळी ११ नंतरही सुरू असल्याने सील केले.