बेपत्ता झालेल्या १३४ महिला अन् १३ बालकांचा शोध; ऑपरेशन मुस्कान मोहीम फत्ते
By विलास जळकोटकर | Published: December 9, 2023 06:27 PM2023-12-09T18:27:14+5:302023-12-09T18:27:35+5:30
पथक स्वगृही परतले
विलास जळकोटकर, सोलापूर : शहरातून गेल्या महिनाभरात बेपत्ता झालेल्या तब्बल १३४ महिला, तरुणी आणि ७ बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वगृही पोहचवण्याची किमया विशेष बाल पोलीस पथकाने केली. त्यानुसार या पथकाने राबवलेली ‘मुस्कान ऑपरेशन’ ही मोहीम फत्ते केली. प्रदीर्घ कालावधीनंतर आपली प्रिय व्यक्ती घरी परतल्याने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.
गत महिन्यातील १ ते ३० नोव्हेंबर महिन्यात शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून लहान मुले, १८ वयोगटाच्या पुढील तरुणी, महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते. तशा तक्रारीही ठाण्यामध्ये नोंदलेल्या होत्या. शिवाय काही बालकांचेही अपहरण झाले होते. या बेपत्ता होण्याच्या प्रकाराचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने आठ पथकांद्वारे ही मोहीम राबवण्यात आली.‘ आपरेशन मुस्कान’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते.
‘ऑपरेशन मुस्कान’ १२ मोहिमेअंतर्गत १८ वर्षावरील बेपत्ता महिला, तरुणींची विशेष शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये १३४ महिला व त्यांच्यासोबत हरवलेल्या ७ बालकांचा शोध घेऊन कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे त्या कुटुंबातील पालकांनी आनंद व्यक्त करुन पोलिसांचे आभार मानले.
दोन पडितांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून १७ नोव्हेंबर रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,६ भादंवि सह कलम ३७० (अ)(२) प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोन पिडित महिलेची सुटका करुन दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
लैंगिक शिक्षणावर १२ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
‘मस्कान ऑपरेशन १२ दरम्यान सोलापूर शहर हद्दीतील शाळांमध्ये जाऊन इयत्ता ५ वी ते १२ वी च्या वर्गातील १२०० विद्यार्थी -विद्यार्थिनींना बालकांच्या लैंगिक अपराधासंबंधी बाल कामगार अधिनियम १९८६ नुसार व हरवलेल्या बालकांचा शोध यासंबंधी व्याख्यान देऊन जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.