पोशिंदाच दुधाच्या शोधात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:26 PM2020-01-31T12:26:49+5:302020-01-31T12:27:42+5:30
कष्टकरी हाच खरा शेतकरी...
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीमुळे त्या दिवशी शाळेतून घरी परत निघायला उशीर झाला. शाळा सोडून पाच-दहा मिनिटे झाली असतील. दोन-चार कि.मी. ओलांडल्यावर रस्त्यावर डावीकडे चौथीतली राधिका दिसली. ‘सर.. सर..’ म्हणून हाक मारली. आवाजाकडे वळून आम्ही थांबलोच. ती पळतच आली. ‘बाबांनी तुम्हाला वस्तीवर बोलवलंय..’ राधिकाचं बोलावणं ऐकून मी मनातल्या मनात पुटपुटलो, ‘आधीच उशीर झालेलं! आता हे काय पुन्हा नवीन?’ पण नाईलाज होता. कारण छोटी राधिका खूपच आग्रहाने बोलवत होती, त्यामुळे आम्ही तिच्या वस्तीवर पोहोचलो.
वस्तीच्या जवळ गेल्यावर तिथला कुत्रा भुंकू लागला, पण ‘सत्या...’ राधिकाच्या या आवाजाने तो गप्पगार झाला. मी सहज म्हटलं, ‘सत्या तुमचा कुत्रा आहे का?’ ‘हो सर’ राधिका बोलली. आमच्या सहकाºयांनी लगेच दुसरा प्रश्न केला, ‘सत्याला सोडून अजून कोण कोण आहेत?’ राधिका उत्तरली, ‘आई, बाबा, मोठा भाऊ, लहान भाऊ, मंगला, गोदा, सख्या-तुक्या!’ आमच्या सहकाºयांनी अवाक् होऊन विचारले, ‘मंगला, गोदा, सख्या-तुक्या हे काय चुलत्याची मुले आहेत का?’ लगेच सांगू लागली, ‘नाही ओ सर! मंगला आमची म्हैस आहे, गोदा गाय आणि सख्या-तुक्या ही बैलजोडी आहे.’ आम्ही दोघेही आश्चर्यचकीत होऊन तिच्या वस्तीवर पोहोचलो. राधिकाचे वडील वस्तीच्या बाहेरच थांबले होते. त्यांनी हसतमुखाने स्वागत केले. बाजेवर बसून आमच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या.
राधिका पाण्याचे दोन ग्लास घेऊन आली. पाणी पिऊन झाल्यावर राधिकाचे वडील म्हटले, ‘गुरुजी, रात्र झाली, आता शहरात जायला खूप उशीर होईल. दोन घास खाऊन इथंच आराम करा.’ आमच्या सहकाºयांनी लगेच तोंड उघडले, ‘खूप कामं आहेत जावं लागेल, राहून कसं चालेल?’ आमचा नकार ठरलेला पाहून राधिकाच्या वडिलांनी आग्रह थांबवला. ‘बरं सावकाश जा, घाई करू नका.. अगं स्वयंपाक आपल्यापुरतंच कर. दोन कप चहा वाढव.’ आई चुलीवर चहा ठेवल्याबरोबर राधिका बाहेर आली. बाबांच्या कानात काहीतरी पुटपुटली, बाबांनी हातवारे करत काहीतरी सांगितले, मग राधिका आमच्यासमोरूनच हाकेच्या अंतरावरील दोन-चार वस्तीवर जाऊन आली. पुन्हा बाबांच्या कानात काहीतरी पुटपुटली.
‘बरं, जा आता! आहे तसा घेऊन ये.’ असे नाराजीच्या स्वरात बाबांचे बोलणे ऐकून राधिका आत गेली व एका घंगाळात (जर्मनच्या ताटात) चहाचे तीन वेगवेगळ्या रंगांचे कप घेऊन आली. तिने आधी मलाच चहा दिला. डिकासीन (काळा चहा) पाहून थोडंसं कसंसंच झालं, पण नाईलाज होता. राधिकाच्या घंगाळातील तिसरा कप उचलून बाबा म्हणाले ‘गुरुजी माफी करा बरं का! काळा चहाच द्यावं लागलं आम्हाला. दुधाचं लईच वांदा झालंय अलीकडं. गोदा दूध देईना झाली महिन्यापासून आणि मंगलाबी सकाळीच दूध देती. गवळी अप्पा सगळंच दूध घेऊन जातो. शेजाºया-पाजाºयांकडंही दूध नाही, म्हणून माफी असावी. दुधात लिंबू पिळलंय मालकिणीनं, थोडं झणझण होईल.’ आम्ही पूर्ण चहा संपवला, तेव्हा ते डिकासीन (म्हणजे शहरातील लेमन टी) पिऊन सकाळपासूनचा शिणवटाच निघून गेला राव!
चहा झाल्यावर पुन्हा मी दुधाच्या तुटवड्याचा विषय छेडला. राधिकाच्या बाबांनी सांगितले, ‘इथं प्रत्येकाच्या वस्तीवर दोन-चार जनावरे आहेतच. लिटरमागे एकवीस रुपये देतो आणि दरमहा एक तारखेला एकरकमी देत असल्याने आम्हाला परवडते, बाजाराचा खर्च निघून जातो. त्यामुळे दुधाची अशी पंचाईत होते. ‘पोशिंद्याकडून एकवीस-बावीस रुपये लिटर दूध घेणारे गवळीअप्पा मात्र शहरात पन्नास रुपये लिटर दूध विकतात आणि आपण निमूटपणे विकत घेतो. याहून कहर म्हणजे ज्याच्या घरी दूध उत्पादन होते तो पोशिंदा मात्र कमी दरात दूध देऊन स्वत:च दुधाच्या शोधात फिरतो हेच मनाला पटत नाही.
- आनंद घोडके
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)