कोकणातील पाणबुडे शोधताहेत सोलापूरच्या विहिरीतील चोरीला गेलेले सिद्धेश्वर चरित्र ग्रंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 10:57 AM2022-07-07T10:57:50+5:302022-07-07T10:57:56+5:30
तिघे अटकेत : अग्निशामक दलही शोधकार्यात
सोलापूर : सिद्धेश्वर महाराज यांच्यावर लिखित चरित्र पुराण चोरट्यांनी रेल्वे लाइन येथील पाटील लंच होमच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत टाकल्याचे समजल्यानंतर, कोकणातील दोन पाणबुड्यांना (गोताखोरांना) बोलावून शोध घेण्यात आला. तब्बल तीन तास चाललेल्या शोधमोहिमेत त्यांना यश आले नाही.
कवी राघवन यांनी लिहिलेला ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांवरील ग्रंथ व पूजेच्या भांड्यांची चोरी उत्तर कसब्यातील राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यात दि.३० जून रोजी रात्री झाली होती. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी विजय भारत गवळी (वय २६), शैलेश विनीत गायकवाड (वय २४, दोघे रा. रेल्वेलाइन परिसर) व अन्य एक विधिसंघर्ष बालक या तिघांना अटक केली आहे. तपासामध्ये तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी चोरलेले चरित्र ग्रंथ पाटील लंच होमच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत टाकल्याचे समजले होते.
पोलिसांनी चरित्रग्रंथाचा शोध घेण्यासाठी कोकणातील चौघा गोताखोरांना बोलावले होते. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत गोताखोरांनी विहिरीच्या तळाशी जाऊन शोध घेतला. मात्र, त्यांना काही मिळाले नाही. शोधमोहीम सुरू असलेल्या विहिरीजवळ ओझर चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटी, राजशेखर हिरेहब्बू आधी उपस्थित होते. ही मोहीम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.
तांब्या-पितळ्याची वस्तूही गेल्या होत्या चोरीला
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या कार्याविषयी कवी राघवन यांचा नऊ अध्याय असलेला सुमारे ४० पानांचा ग्रंथ हिरेहब्बू वाड्यात एका सागवानी पेटीमध्ये पूजेसाठी ठेवण्यात आला होता. गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चोरट्यांनी वाड्यात प्रवेश करून हा ग्रंथ तसेच पितळी दिवा, तांबा धातूच्या तांब्या, असा ऐवज पळवून नेला. शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सागर हिरेहब्बू हे पूजा करीत असताना चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती हिरेहब्बू यांनी फौजदार चावडी पोलिसांना दिली होती.
दोघे सध्या पोलीस कोठडीमध्ये
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून दि.२ जुलै रोजी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.