टेंभुर्णीजवळ ऊसतोड मजुरांच्या दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:01 AM2019-02-27T11:01:35+5:302019-02-27T11:02:26+5:30
टेंभुर्णी: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या मोटर-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार ...
टेंभुर्णी: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या मोटर-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले असून दोघे जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात महामार्गावरील शिराळ (टें)(ता.माढा) पाटीजवळ रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
मृतांमध्ये पती-पत्नी व दहा वर्षांचा नातू यांचा समावेश आहे. मयत व जखमी एकाच कुटुंबातील असून उंडेगाव (ता. परांडा,जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी आहेत. नवनाथ उगाजी गायकवाड (वय-५५), पत्नी अलका नवनाथ गायकवाड (वय-४५), नातू सूरज उर्फ काळू किरण कांबळे (वय-१०) सर्व (रा.उंडेगाव ता.परांडा,जि.उस्मानाबाद) अशी मयतांची नावे आहेत. अक्षय नवनाथ गायकवाड (वय-२७) व गिरज किरण कांबळे (वय-८ दोघे रा. उंडेगाव) हे दोघे जखमी असून यातील गिरज किरण कांबळे याची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यातील मयत व जखमी हे सर्वजण भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याकडे भिवा विठ्ठल चौधर (रा.गीतेवाडी ता.जामखेड) या मुकादमच्या ट्रॅक्टरवर ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत होते. सुर्ली येथे राहत होते. दोनच दिवसापूर्वी कारखाना बंद झाला होता. त्यानंतर उद्या हे सर्वजण गावी जाणार होते.
हिशोब पाहण्यासाठी ते सर्वजण माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक कारखाना कार्यस्थळावर गेले होते. ते सर्वजण सुर्लीकडे मोटारसायकल वरून सायंकाळी ७.३० वा.च्या सुमारास महामार्गावरून शिराळ टे येथे महामार्ग ओलांडून पुढे जाताना पाठीमागील कारने (एम. एच. १३-बी. एन. ९९५१) त्यांच्या मोटारसायकलला (एम. एच. २५-ए. ई. ९१७) पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये अलका नवनाथ गायकवाड, नवनाथ सयाजी गायकवाड हे पती-पत्नी व नातू सुरज किरण कांबळे मयत झाले . गिरीज कांबळे याच्यावर इंदापूर येथे तर अक्षय गायकवाड याच्यावर टेंभुर्णी येथे उपचार चालू आहेत.