कोरोनाची दुसरी लाट तीन महिन्यांनंतर ओसरू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:12+5:302021-06-04T04:18:12+5:30
बाधित रुग्ण आढळताच येथील तालुका महसूल, ग्रामविकास व आरोग्य विभागाने लागलीच उपाययोजना सुरुवात केली. तोपर्यंत अनेक भागांतून व ...
बाधित रुग्ण आढळताच येथील तालुका महसूल, ग्रामविकास व आरोग्य विभागाने लागलीच उपाययोजना सुरुवात केली. तोपर्यंत अनेक भागांतून व गावांतून बाधित रुग्ण वाढू लागले होते. यावेळी आरोग्य विभागाने बाधित रुग्ण शोधण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले व त्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर येथील कोविड सेंटरमधून योग्य ते उपचार करून त्यातील बहुसंख्य रुग्ण ठणठणीत बरेदेखील केले. यामुळेच माढा तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून गावागावात पसरलेली कोरोनाची दुसरी लाट ही गेल्या आठवड्यापासून ओसरू लागल्याचे आरोग्य विभागाच्या रिपोर्टवरून दिसून येत आहे.
माढा तालुक्यात दोन आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळणाऱ्या एकूण ४७ गावांतून आरोग्य तपासणीत अगदी नगण्य रुग्ण आढळू लागले आहेत. १८ मे ते २५ मे दरम्यानच्या काळात एकूण ५,६३४ कोविड तपासणी करण्यात आल्या. त्यामध्ये ७४५ जण बाधित आढळून आले होते. तर गेल्या आठवड्यात म्हणजे २६ मे ते १ जूनपर्यंत करण्यात आलेल्या ६,३२८ जणांच्या तपासणीत फक्त ३९४ बाधित आढळून आले. गेल्या तीन दिवसांपासून तर माढा तालुक्यात दररोज करण्यात येत असलेल्या एकूण तपासणीत २० ते २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.
-----
हॉटस्पॉट १२ गावे अन् संख्या
- टेभुर्णी (१५८), मोडनिंब (६१), अरण (४९), चांदज (३२), माढा (३१), पिंपळनेर (२६), उपळाई (२५), कुर्डूवाडी (२४), परिते (२४), उपळवाटे (२४), चिंचगाव (२३), शेवरे (२०) अशी हॉटस्पॉट असलेली गावे आहेत.
---
मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे
१२ गावे वगळता सर्व गावांनी कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे. संबंधित हॉटस्पॉट गावांतून जसजशी रुग्ण संख्या कमी होईल तसतशी तालुक्यातून कोरोना संख्या हद्दपार होईल, त्यामुळे सर्वांनी आता कोविड मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून कमी होत असलेली रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये याचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी थोरात यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
-----