नावाच्या घोळात सचिवाची खुर्ची रिकामीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:16 AM2021-06-06T04:16:59+5:302021-06-06T04:16:59+5:30
सोलापूर बाजार समितीचे सचिव अंबादास बिराजदार ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना सहा महिनेच सचिव म्हणून काम करण्याची संधी ...
सोलापूर बाजार समितीचे सचिव अंबादास बिराजदार ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना सहा महिनेच सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसे सेवाज्येष्ठतेचा विचार झाला तर सहायक सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांना संधी मिळायला हवी. सेवाज्येष्ठतेचा विचार केला असता तर उमेश दळवी सेवानिवृत्त झाल्यानंतरच सूर्यवंशी यांना सेवाज्येष्ठतेनुसार सचिव पदाची संधी मिळाली असती. मात्र, अंबादास बिराजदार यांना संधी मिळाली. आता बिराजदार सेवानिवृत्त झाल्याने सचिवाची खुर्ची पुन्हा रिकामी झाली आहे.
संचालक मंडळाची बैठक २७ मे रोजी झाली. खरे तर याच बैठकीत सचिवाच्या नावावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र, बैठकीत संचालक आपल्या सोईने नावे सांगतील म्हणून हा विषय चेअरमन आमदार विजयकुमार देशमुख यांना अधिकार देऊन संपविण्यात आला.
---
आता बिराजदारांनंतर कोण?
जुलै २०१८ मध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आले. त्यावेळी मोहन निंबाळकर सचिव होते. निंबाळकर यांची मुदत संपल्यानंतर मुदतवाढीचा विषय उपस्थित झाला होता व चेअरमन विजयकुमार देशमुख यांनी मुदतवाढीला होकारही दिला होता. मात्र, काही ज्येष्ठ संचालकांनी अंतर्गत विरोध केला. त्यामुळे उमेश दळवी यांना संधी मिळाली. दळवी सेवानिवृत्त झाल्याने बिराजदार यांची सचिवपदी वर्णी लागली. आता बिराजदार यांची जागा कोण घेणार याकडे लक्ष लागले आहे.
----