अंगणात गुपचूप लग्न पडलं महागात; नवरीचा भाऊ निघाला कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:38 PM2020-06-03T12:38:36+5:302020-06-03T12:41:22+5:30
अक्कलकोट तालुक्यातील प्रकार; लग्नासाठी आलेले चाळीस जण क्वारंटाईन
अक्कलकोट : लॉकडाऊन असतानाही प्रशासनाची परवानगी न घेता एका कुटुंबाने राहत्या घरासमोरच्या अंगणात गुपचूप लग्न उरकले. त्यामध्ये कर्नाटकातून आलेल्या पाहुण्यांपैकी नवरीचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणातील तब्बल ४० जणांना प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्यात आले आहे.
हंजगी येथील दयानंद काशिनाथ पाटील यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी ३१ मेच्या भल्या पहाटे अंगणात शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकले. हंजगी गावचा नवरा तर कर्नाटकातील कपनिवर्गी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर) येथील नवरी यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. मात्र, तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये सतत वाढ होत असल्याने अखेर घरच्या घरी लग्नकार्य उरकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रविवारी पहाटे दोन्ही बाजूची पाहुणे मंडळी एकत्रित आली. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अक्षता टाकून पाहुणे जेवणावळी करून निघून गेले, अशी चर्चा आहे. याची गावातील कोरोना नियंत्रण समितीसह कोणालाच माहिती नाही. या लग्नाला हंजगी परिसरातील जेऊर, दोड्याळ यासह अनेक गावच्या पै-पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या कर्नाटकातील नवरीच्या भावाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याची माहिती अक्कलकोट तहसील प्रशासनाला मिळाली. यामुळे दोन दिवसांत ४० हून अधिक जणांना तहसीलदार अंजली मरोड यांच्या आदेशानुसार क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.
भाऊ आला होता कर्नाटकातून..
- नवरीचे आई, वडील मुंबई येथे वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे ते कर्नाटकातील कपनिवर्गी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर) या आपल्या मूळगावाकडे राहण्यास आले होते. ते रेड झोनमधून आल्याने त्या कुटुंबातील नवरीसह सर्वांना स्थानिक कोरोना नियंत्रण समितीने क्वारंटाईन केले होते. त्या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी नवरीसह काही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. आई, वडील व भावाचे रिपोर्ट येणे बाकी होते. त्याचा विचार न करता होम क्वारंटाईन असतानाही ते हंजगी येथे लग्नाला आले होते. दरम्यान, सोमवारी इंडी येथील प्रशासनाकडून अक्कलकोटच्या तहसीलदारांना मोबाईलद्वारे नवरीचा भाऊ पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून अलर्ट होऊन अक्कलकोट प्रशासनाने कार्यवाहीस प्रारंभ केला आहे.
हंजगीत विनापरवाना एका जोडप्याचे लग्न करण्यात आले आहे. त्या ठिकाणी उपस्थितांपैकी कर्नाटकातून आलेल्यांमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा समावेश होता. म्हणून आतापर्यंत सुमारे ४० लोकांना क्वारंटाईन केले आहे. संबंधितावर तपासाअंती कायदेशीर कारवाई होणार आहे.
- तुकाराम राठोड,
सपोनि, दक्षिण पोलीस ठाणे,