बागल, सावंत व देवी एकत्रित दिसल्याने राजकारण तापलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:25 AM2021-08-27T04:25:44+5:302021-08-27T04:25:44+5:30

नासीर कबीर करमाळा : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत, देवी व बागल सावंत यांच्या संपर्क कार्यालयात एकत्र आल्याने होऊ ...

Seeing Bagal, Sawant and Devi together, politics got heated | बागल, सावंत व देवी एकत्रित दिसल्याने राजकारण तापलं

बागल, सावंत व देवी एकत्रित दिसल्याने राजकारण तापलं

Next

नासीर कबीर

करमाळा : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत, देवी व बागल सावंत यांच्या संपर्क कार्यालयात एकत्र आल्याने होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत हे तिघे एकत्र येण्याची कुजबुज सुरू झाली आहे.

नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागली असून, प्रभाग रचना करण्याचे काम सुरू झाले आहे. यानिमित्ताने मागील अनेक दिवसांपासून सावंत, देवी व बागल हे तीन गट एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. परंतु तिन्ही गटांच्या वतीने याकडे दुजोरा देण्यात आलेला नव्हता किंवा आजही कोणीही त्या पद्धतीने जाहीर वक्तव्य केलेले नाही. परंतु सावंत गटाने जगताप गटाबरोबर असलेला दोस्ताना तोडला आहे.

सावंत गटाने नगर परिषदेत विविध विषय समितीच्या निवडीत गैरहजर राहण्याची घेतलेली भूमिका, बाजार समितीमध्ये सचिव निवडीत जगताप गटाच्या विरोधात घेतलेली भूमिका लपून राहिलेली नाही. सावंत गटाने जगतापविरोधी भूमिका उघड उघड घेण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय नागरिक संघटनेचे नेते कन्हय्यालाल देवी यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीत जगताप यांच्याबरोबर युती नको, असा पवित्रा घेतला असून, त्यांनी बागल गटाशी जवळीक वाढवली आहे.

नगर परिषदेच्या गत निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाने एकत्र येऊन युती करत निवडणूक लढवली व नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैभवराजे जगताप यांचा विजय झाला. त्या वेळी देवी, सावंत व शिंदे गट हे विरोधात लढले होते. शिंदे गटाकडून नागरिक संघटनेचे कन्हय्यालाल देवी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजयमामा शिंदे यांना साथ दिली. त्यांच्या पाठिंब्याने शिंदेंचा आमदारकीचा विजय सुकर झाला.

एकूणच नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गटातटाचं वातावरण ढवळून निघू लागलं आहे.

--

सावंता संजयमामांकडे.. जवळीक बागल गटाकडं

सध्या सावंत, देवी दोघेही संजयमामा शिंदेंबरोबर आहेत; पण आता नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत व देवींनी बागल गटाशी जवळीक वाढवली आहे. गुरुवारी दुपारी सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या संपर्क कार्यालयात खुलेपणाने सावंत, बागल व देवी एकत्रित बसले होते. यासंदर्भात सावंत यांना विचारले असता, घरगुती कार्यक्रमानिमित्ताने आम्ही एकत्रित आलो होतो, असे ते म्हणाले.

---

युतीसंबंधी चर्चा झाली : नालबंद

दोन दिवसांपूर्वी बागल गटाची नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागल यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत नगर परिषद निवडणुकीत सावंत व देवी यांच्याबरोबर युती करण्यासंदर्भात विषय झाला असल्याचे माहिती घेतली असता नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते शौकत नालबंद यांनी सांगितले.

----

Web Title: Seeing Bagal, Sawant and Devi together, politics got heated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.