मृतदेह पाहून जिथं नातेवाईक पळ काढतात; अंत्यसंस्कारासाठी यांचेच हात पुढे येतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:21 AM2020-06-24T11:21:02+5:302020-06-24T11:23:10+5:30
सोलापुरातील शववाहिका चालकांचे योगदान; अहोरात्र बजावतात सेवा बजाविणारे योध्दे
राकेश कदम
सोलापूर : कोरोनामुळे घरातला माणूस मेला तर सर्वांनाच दु:ख होतं. पण स्मशानभूमीत गेल्यावर नातेवाईकही धजावत नाहीत. तिथे महापालिकेच्या शववाहिकेचे सहा कर्मचारी ड्रायव्हरच्या भूमिकेतून नातेवाईकांच्या भूमिकेत येतात. प्रकाश चंदनशिवे, ज्ञानेश्वर लांबतुरे, गोविंद देवडे, शैलेंद्रसिंह कय्यावाले, धोंडिबा लवटे, बाबुराव हणमशेट्टी अशी त्यांची नावे.
महापालिकेच्या आयडीएच हॉस्पिटलमधून शववाहिका आणि रुग्णवाहिकेची सेवा दिली जाते. सिव्हिल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मरण पावलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह स्मशानात नेण्याची जबाबदारी या सहा चालकांवर आहे. त्यांना कामाच्या वेळाही ठरवून दिल्या आहेत.
कोरोनाचा पहिला बळी ठरलेला तेलंगी पाच्छापेठेतील दुकानदाराचा मृतदेह प्रकाश चंदनशिवे (वय ५७) आणि ज्ञानेश्वर लांबतुरे (वय ५४) यांनीच सिव्हिलमधून कब्रस्तानात आणला होता. त्यानंतर चार दिवसांनी आणखी एकाचा मृत्यू झाला. त्यावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ड्रायव्हर आणि मृतदेह यांच्यात कोणत्याही प्रकारचे पार्टिशन नव्हते. तोंडाला मास्क, हातात मोजे होते. पीपीई किट नव्हते. पण भीती वाटली नाही, असे चंदनशिवे सांगतात. धोंडिबा लवटे, देवडे (वय ५६), हणमशेट्टी, लांबतुरे हे चार जण परिवहन उपक्रमाच्या सेवेत होते. परिवहन खाते डबघाईला आल्यानंतर यांची शववाहिकेवर नेमणूक करण्यात आली. दहा वर्षात बरे-वाईट अनुभव आले. पण कोरोना अनुभव विदारक असल्याचे धोंडिबा लवटे (वय ५१) सांगतात.
कोरोनाचा रिपोर्ट यायला दोन ते तीन दिवस लागतात. तोपर्यंत मृतदेह पडून असतो. मृतदेहाचे वजन वाढलेले असते. स्मशानातल्या लोकांना उचलणे अवघड जाते. नातेवाईक नसले की आम्हालाच हा मृतदेह उतरवून घ्यावा लागतो. बाबुराव हणमशेट्टी (वय ५७) म्हणतात की, शववाहिकेवर काम करायची इच्छा पूर्वीपासूनच नाही. पण सिटी बस बंद आहे. पगारही वेळेवर होत नाही. मी सुद्धा आणखी एक वर्षानंतर निवृत्त होईन.
एक वर्ष काढायचे म्हटले तर हे कोरोनाचे संकट आले. जीव धोक्यात घालून काम करतोय याची जाणीव आहे. पण एकदा काम करायचे ठरवले म्हटले तर पूर्ण करावेच लागेल.
मृतदेहाचे तुकडे गोळा केले, कोरोना काय करणार !
- कोरोनाची भीती वाट नाही का?, असे विचारल्यावर चंदनशिवे, लांबतुरे यांच्यासह सर्व जणांनी गेल्या दहा वर्षातील अनुभव कथन केले. प्रकाश चंदनशिवे म्हणाले, गेल्या दहा वर्षात आम्ही रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले तुकडे गोळा केलेत. विहिरीमध्ये पडलेले मृतदेह बाहेर काढायला मदत केली. अपघातात छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह आणले. सोलापुरातून उत्तर प्रदेश, कोलकाता भागात मृतदेह घेऊन गेलोय. मृतदेहाच्या बाजूला बसून गाडीतच जेवण केलंय. गाडीतच झोपलोय. कोरोना होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय. पण हा कोरोना तर आमचे काय करणार आहे?
मुलाचा वाढदिवस विसरून गेलो
- लांबतुरे म्हणाले, गेल्या तीन महिन्यात आमच्या स्मशानात दररोज चार ते पाच फेºया होतात. घरातल्या माणसांकडे बघायला वेळ नाही. ४ मे रोजी मुलाचा वाढदिवस होता. तो घरात वाट बघत बसला होता. स्मशानातल्या फेºयांच्या नादात मी वेळेवर घरी जायचे विसरून गेलो होतो