सिद्धेश्वर तलावाचे पाणी पाहताच चिखल कासवाने धपकन मारली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 02:27 PM2020-10-22T14:27:18+5:302020-10-22T14:29:13+5:30
सोलापुरातील घटना; गीतानगर येथील आनंद दुध्याल कुटुंबियांना लागला लळा
सोलापूर : मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहत आलेल्या चिखल कासवाने आपल्याच नैसर्गिक गतीने हळुवारपणे वैभव दुध्याल कुटुंबीयांच्या घरात केव्हा प्रवेश केला त्यांना कळलेच नाही़ मांगल्याचे प्रतीक असलेल्या कासवाचे त्यांनी स्वागत करीत त्याच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली.
दरम्यान, चारच दिवसांत या कुटुंबाला त्याचा लळा लागला होता़ इंटरनेटवर त्याला कोणते खाद्य लागते याचा शोध घेत उत्तम खानपानाची व्यवस्था केली, पण त्यांनी दिलेल्या कोणत्याही पदाथार्ला न शिवता तो सारखे एका कोप?्यात जाऊन बसू लागला. अन्नसेवन करत नसल्याने उपासमारीने तो दगावेल, अशी भीती वाटत असल्याने दुध्याल कुटुंबीयांनी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांशी संपर्क साधला. भरत छेडा आणि पप्पू जमादार या वन्यजीवप्रेमी सदस्यांनी हा कासव नामशेष होणा?्या दुर्मीळ प्रजातीतील असून ते पाळणे चुकीचे असून, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचा सल्ला दिला. दुध्याल कुटुंबीयांनी तो कासव त्यांच्याकडे सुपूर्द केला. बुधवारी सकाळी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सिद्धेश्वर तलावाच्या विष्णुघाट परिसरात आणून त्याला पेटीतून बाहेर काठावर ठेवताक्षणीच त्याने धपकन तलावात उडी मारून पाण्यात दिसेनासा झाला.
तलाव स्वच्छ ठेवण्यात कासव अग्रेसर...
आनंद दुध्याल कुटुंबियांकडे आलेला हा कासव चिखल कासव (स्लॅपशेल) या नावाने ओळखला जातो. हा नऊ ते दहा वर्षांचा असून गडद शेवाळी आणि तपकिरी रंगात हा आढळतो. पाणथळ ठिकाणी अधिवास असलेल्या या कासवाचे सरासरी आयुष्यमान तीस ते चाळीस वर्षे असते. तलावातील वनस्पतींची मुळे, मेलेले मासे, खेकडे खाऊन तलाव स्वच्छ ठेवण्यात अग्रेसर असल्याने तो स्वच्छतादूत म्हणून परिचित आहे.
सोलापुरात पावसाच्या पाण्यात वाहून आलेला हा चिखल कासव असून ही प्रजात मुख्यत: विस्तीर्ण तलावात आढळते. जमिनीवर येऊन खड्डा करून एका वेळी पंधरा ते वीस अंडी घालते. अतिदुर्मीळ प्रजातीमधील हा चिखल कासव असून तीन ते चार महिने तो अन्नाविना जगू शकतो. त्याला पाळून हौदात ठेवणे चुकीचे असून हा गंभीर गुन्हा ठरतो, असे निदर्शनास आल्यास तीन ते नऊ महिने शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड होऊ शकतो.
- भरत छेडा, पप्पू जमादार, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर