काळ्या बाजाराने जाणारा २० टन तांदूळ पकडला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:35+5:302021-05-30T04:19:35+5:30

मोहोळ : शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातील २० टन तांदूळ दुसऱ्या पोत्यात भरून सोलापूरहून अहमदनगरकडे वाहतूक करणारा ट्रक शनिवारी ...

Seized 20 tonnes of black market rice; | काळ्या बाजाराने जाणारा २० टन तांदूळ पकडला;

काळ्या बाजाराने जाणारा २० टन तांदूळ पकडला;

Next

मोहोळ : शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातील २० टन तांदूळ दुसऱ्या पोत्यात भरून सोलापूरहून अहमदनगरकडे वाहतूक करणारा ट्रक शनिवारी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास मोहोळ पोलिसांनी पकडला. हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातलाच आहे का? याची खातरजमा करण्यासाठी तांदळाचे नमुने महसूल विभागाच्या पुरवठा विभागामार्फत प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. अहवाल प्राप्त होताच गुन्हा नोंदवला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.

पोलीस सूत्रांनुसार २९ मे रोजी रात्री १२ नंतर सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे गस्त घालत होते. यादरम्यान ट्रकमध्ये (एमएच १२ एफएफ १३७४) शासन मान्य स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ दुसऱ्या पोत्यामध्ये भरून सोलापूरहून अहमदनगरकडे येथे जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या सूचनेनुसार हवालदार मुन्ना बाबर व पो. नाईक अमोल घोळवे यांंच्या पथकाने रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सावळेश्वर टोलनाक्याच्याजवळ तुळजाई हॉटेलजवळ ट्रक (एमएच १२ एफ एफ १३७४) अडवून चौकशी केली. सदर गाडीमध्ये ४ लाख २९ हजार ५६८ रुपये किमतीचे २० टन तांदळाचे ४०० कट्टे आढळून आले. तो तांदूळ सुपा जिल्हा अहमदनगर येथील गजानन ॲग्रो सेल्स येथे नेत असल्याचे संबंधितांनी सांगितले. कलबुर्गी ट्रेेडर्स जनरल मर्चंट ॲन्ड कमिशन एजंट सोलापूर येथून श्री गजानन ॲग्रो सेल्स नावाने २०,२१५ किलो ग्रॅम व रक्कम ४,२९,५६८ रुपयांची पावती आढळून आली. या पावतीवर कोणत्याही प्रकारचा शासकीय सही शिक्का दिसून आला नाही.

-----

दोघे ताब्यात.. ट्रक ठाण्यात

पोलिसांना सशंय आल्याने या गाडीमधील तांदळाची शहानिशा करण्याकरिता वाहनचालक हरिदास नारायण माळी व महेश हणुमंत फडतरे (दोघे रा. तुगंत ता.पंढरपूर) या दोघांना ताब्यात घेतले. संबंधित ट्रक मोहोळ पोलीस ठाण्याच्या आवारात लावून वाहनामधील तांदळाच्या पोत्याची पाहणी केली. या पोत्यावर वेगवेगळ्या कंपन्याची नावे आढळून आली. सदरचा माल हा सोलापूर येथील दयानंद कॉलेजच्या पाठीमागील गोडावूनमध्ये कलबुर्गी ट्रेेडर्स जनरल मॅर्चंट ॲण्ड कमिशन एजंट, सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर येथे भरल्याचे निष्पन्न झाले आहे.

---

अहवालानंतर कारवाई

सदरचा तांदूळ हा रेशनचाच असून, ५० किलोच्या दुसऱ्या पोत्यामध्ये भरून विक्रीसाठी कलबुर्गे ट्रेडर्सच्या मालकाच्या सांगण्याप्रमाणे व दिलेल्या पावतीप्रमाणे घेऊन जात असल्याचे चालक हरिदास माळी जबाबात सांगितले आहे. या वाहनामध्ये असलेल्या ४०० कट्ट्यातील तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे व लोकांकडून कमी दराने घेऊन ते काळ्या बाजारात विक्री नेत असल्याबद्दल पोलिसांचा संशय बळावला. यामुळे सदर तांदळाची पुरवठा विभागामार्फत तपासणी करण्याचे पत्र मोहोळ पोलीस स्टेशनकडून महसूल विभागाला देण्यात आले आहे. तातडीने पुरवठा निरीक्षक संदीप गायकवाड यांनी गाडीतील तांदळाचे नमुने सोलापूर व पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवून दिले आहेत. तो अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Seized 20 tonnes of black market rice;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.