'आरटीई'मध्ये निवड २ हजार मुलांची, प्रवेश फक्त ८ जणांना!
By शीतलकुमार कांबळे | Published: April 18, 2023 01:57 PM2023-04-18T13:57:40+5:302023-04-18T13:57:53+5:30
RTE अंतर्गत मोफत प्रवेश, वेबसाईट स्लो, पालकांना एसएमएस येईना
शीतलकुमार कांबळे, सोलापूर: आरटीई अंतर्गत बालकांना शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो. सध्या याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, पालकांना एसएमएस येत नसून आरटीईची वेबसाईट स्लो आहे. त्यामुळे दोन हजार मुलांची निवड झालेली असतानाही फक्त आठ जणांनीच प्रवेश घेतला आहे.
यंदाच्या वर्षी आरटीईसाठी २९५ शाळांनी नोंदणी केली असून २३२० जागांवर मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातून ७७३८ पालकांनी आपल्या मुलांसाठी अर्ज सादर केला आहे. त्यापैकी २ हजार १६० मुलांची निवड झाली असून फक्त आठ जणांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे.
५ एप्रिल रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाल्यानंतर १२ एप्रिल रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त पाठविण्यात येत आहेत. मात्र, बहुतांश पालकांना एसएमएस मिळाले नसून वेबसाईट ओपन होत नसल्यामुळे पालक मुलाच्या प्रवेशाची चिंता करत आहेत.
--------
वेबसाईट स्लो असल्यामुळे आरटीईतून प्रवेश घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यादीत नावे असलेल्या मुलांना प्रवेश घेता यावी अशी सर्वांची भूमिका आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मुदत वाढवून मिळेल.
- संजय जावीर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद