माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 11:33 AM2020-07-15T11:33:31+5:302020-07-15T13:18:04+5:30
सहा लाखांसाठी स्वत:सह कुटुंबालाही संपवले; सोलापुरातील घटनेने सर्वत्र हळहळ
सोलापूर : ‘मला सहा लाख रुपयांचं देणं आहे. माझ्या नावे असलेली संपत्ती विकून टाका आणि आलेल्या पैशांमधून नातेवाईक अन् इतरांचं देणं देऊन टाका. आम्हा सर्वांचे अवयवदान करा’, अशी चिठ्ठीत इच्छा व्यक्त करून अमोल जगताप याने दोन मुलांसह पत्नीचा खून करून आपली जीवनयात्रा संपवली.
अमोल जगताप हे हांडे प्लॉट येथील गुरुकृपा बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होते. पत्नी मयूरी, सात वर्षांचा मुलगा आदित्य व पाच वर्षांचा दुसरा मुलगा आयुष यांच्यासह ते राहत होते. कोंडी येथील हॉटेल गॅलक्सी हे डान्स बार चालवत होते. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्यामुळे अमोल जगताप हे आर्थिक अडचणीत आले होते. त्यांनी पूर्वी नातेवाईकांकडून सहा लाख रुपये घेतले होते. ते पैसे त्यांना परत करावयाचे होते. पैसे देणार असल्यामुळे अमोल जगताप हे तणावामध्ये आले होते, त्यांनी स्वत:ला, पत्नी व दोन मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला.
आत्महत्येपूर्वी जगताप यांनी चिठ्ठी लिहिली होती, त्यामध्ये त्यांनी मी, पत्नी व मुलांना संपवत असून स्वत:ही आत्महत्या करीत आहे. यामध्ये कोणालाही दोषी धरू नये, माझ्या नावे असलेली संपत्ती विकून त्यातून येणाºया पैशातून नातेवाईकांचे देणे देऊन टाकावे असे म्हटल होते.
अमोलवर खुनाचा गुन्हा दाखल
अमोल जगताप याने राहत्या घरी पत्नी मयूरी, मुलगा आदित्य व आयुष या तिघांचा खून केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोठे बंधू राहुल अशोक जगताप (वय ४६, रा. उमानगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत.
चौघांचा मृतदेह प्लास्टिकमध्ये..
अमोल जगताप, त्यांची पत्नी व दोन मुले यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यापूर्वी प्लास्टिकच्या मोठ्या पिशवीमध्ये घालण्यात आला होता. सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे पोलीस प्रशासनाने काळजी घेतली होती. प्लास्टिकच्या पिशवीत अॅम्ब्युलन्समधून चौघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक
वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी
बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश