सात वर्षांनंतर यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:25 PM2020-09-18T12:25:43+5:302020-09-18T12:28:43+5:30
सोलापूर जिल्ह्यातील रस्ते, बंधारे वाहून गेले : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणार
सोलापूर : सात वर्षांनंतर यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसाने सांगोल्यातील रस्ते तर करमाळा तालुक्यातील उमरड येथील बंधारा वाहून गेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाने अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील घरांची पडझड व काढणीला आलेल्या उडदाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथील ओढ्यावरील पुलाच्या पाण्यात कार वाहून गेल्याने राघवेंद्र खरे (वय ४९) यांचा मृत्यू झाला. ते आटपाडीहून पिलीवमार्गे झिंजेवस्तीकडे जात होते. सांगोल्यातील स्मशानभूमी व सात घरांवरील पत्रे उडाले आहेत. तसेच महुद ते महिम व महिम ते तांदूळवाडी हा जिल्हा परिषदेने तयार केलेला रस्ता वाहून गेला आहे. भाळवणी येथील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबविण्यात आली होती.
जिल्ह्यात सरासरी १७ मिमी पावसाची नोंद
बुधवारी सरासरी १७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. गुरुवारी सकाळीही पाऊस सुरूच होता. जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ४८८ मि. मी. आहे. पण १६ सप्टेंबरअखेर ४७८.१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाने सप्टेंबरआधीच सरासरी ओलांडल्याचे चित्र असून, सात वर्षांनंतरचा हा टप्पा असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले.
पिकांचे पंचनामे करणार
पावसाने अनेक शेतात पाणी घुसले आहे. यामध्ये काढून टाकलेला उडीद व बागायती पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे सूचित केले आहे.
वर्षनिहाय असा झाला पाऊस (मि. मी.)
२०११ ४११
२०१२ ३०६
२०१३ ५००
२०१४ ३५६
२०१५ १४३
२०१६ ३९५
२०१७ ४१५
२०१८ २४०
२०१९ ३३०
२०२० ४७८