सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे उरकले आॅक्टोबरच्या पावसाने पुन्हा झोडपले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:43 PM2020-10-15T12:43:29+5:302020-10-15T12:46:02+5:30
२५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान: खरिपाचे नुकसान तर रब्बीची पिके धोक्यात
सोलापूर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे बुधवारी पूर्ण होत असतानाच वादळी पावसाने झोडपल्याने हाती आलेल्या खरीप पिकांचे नुकसान तर पेरणी झालेली रब्बीची पीके धोक्यात आली आहेत. अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे.
सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात जिल्ह्याला पावसाने झोडपले. यामध्ये काढणीला आलेल्या उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी खात्यामार्फत सुरू करण्यात आले होते. प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले होते. पण बुधवारी सर्व तालुक्यातून आकडेवारी हाती आल्यावर २५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
खळ्यात कुजल्या राशी
सप्टेंबरमधील पिकांच्या नुकसानीची आकडेवारी जुळवत असतानाच मंगळवारी रात्रीपासून पुन्हा जिल्ह्याला पावसाने झोडपले. जिल्ह्यात संततधार कायम असून, सप्टेंबर महिन्यापेक्षा या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन शेतातच राहिले तर काढलेले धान्य खळ्यात कुजले आहे.
शेततळी रिकामी करा
संततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक तलाव भरले आहेत. त्यामुळे सांडवे मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अनेक शेतक?्यांच्या शेतात शेततळी आहेत. सततच्या पावसाने या शेततळ्यांना धोका असून, यातील पाणी शेतकºयांनी रिकामे करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
कांदा, ऊस भुईसपाट
अशीच परिस्थिती मका, भुईमुगाची झाली आहे. गेल्या आठवड्यात पावसाने उसंत दिल्यावर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या उगवणीला फटका बसणार आहे. याचबरोबर शेतात पाणी साचून राहिल्याने कांदा व ऊस आडवा झाला आहे. तूर, द्राक्ष, डाळिंब, केळी, बोर, सीताफळ, भाजीपाल्यांनाही फटका बसला आहे.
पुन्हा पंचनामे होणार
सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ही आकडेवारी शासनाला पाठविण्यात येणार आहे. आता मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मोठा फटका बसला आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर पंचनामे करण्यात येतील अशी माहिती कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.