पंढरपूरात सेवेकºयांची वारकरी सेवा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:24 PM2018-07-12T13:24:41+5:302018-07-12T13:27:31+5:30
आषाढी वारी सोहळा : वरिष्ठांच्या आदेशानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू
पंढरपूर : आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह सोलापूर येथे विविध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठका झाल्या़ त्यात आषाढी सोहळा हायटेक करण्यासाठी आणि वारकºयांना चांगल्या सेवासुविधा मिळाव्यात यासाठी सर्व कामे वेळेवर व्हावीत, असा निर्णय घेण्यात आला़ त्याचे नियोजनही करण्यात आले़ त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वारकºयांच्या सेवेसाठी प्रशासनातील सेवेकरी जोरदार कामाला लागल्याचे दिसून येत आहे़
आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह अन्य पालखी सोहळा व दिंडीमधून पंढरीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत़ या वारकºयांना कशाचीच कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे़ त्यादृष्टीने कामे सुरू आहेत़
पंढरीत येणाºया वारकºयांना चंद्रभागेत पवित्र स्नान मिळावे़ त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे़ शौचालयाची व्यवस्था, स्वच्छता याबाबत नगरपरिषद यंत्रणा कामाला लागली आहे़ तसेच शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी किंवा जी आषाढीपर्यंत पूर्ण होऊ शकत नाहीत, ती कामे थांबवून रस्ते रहदारीस खुले करण्यात येत आहेत़ जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही़
भाविकांच्या सुरक्षिततेविषयी पोलीस प्रशासन वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करीत आहे़
शहरातील व शहराबाहेरील वाहतूक व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जास्तीचा बंदोबस्त मागवत आहे़ वारकरी ज्या मठात किंवा धर्मशाळेत राहणार आहेत, त्या ठिकाणी अखंडितपणे वीजपुरवठा व्हावा यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारीही सतत दक्ष आहेत़
सर्वात महत्त्वाचे वारकºयांना सुलभ विठ्ठलाचे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेची सोय केली आहे़ या दर्शन रांगेतील वारकºयांना दर्शन रांगेतच पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधा यासह अन्य सुविधा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ १० ते १५ लाख भाविक या सोहळ्यासाठी येतील, असे गृहित धरून अत्यावश्यक आरोग्य सुविधेसाठी जागोजागी रुग्णवाहिका, वाढीव बेडस्, तात्पुरते कॉलरा रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे़ शिवाय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपात कामाची लगबग सुरू आहे़ पंढरीत येणारा प्रत्येक भाविक प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातो़ त्यामुळे भाविकांना हा प्रसाद सहज उपलब्ध व्हावा, यासाठी १० लाखांपेक्षा जास्त बुंदी लाडूची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे़ उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनेही जास्तीचा औषधसाठा मागविण्यात आला आहे़
पालख्यांचे जिल्ह्यात होतेय आगमन
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १७ जुलै रोजी नातेपुते, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जुलै रोजी अकलूज, संत एकनाथ महाराज पालखी सोहळा १७ जुलै रोजी बिटरगाव, संत मुक्ताबाई पालखी सोहळा १७ जुलै रोजी शेंद्री, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा १६ जुलै रोजी रायगाव, संत गजानन महाराज पालखी सोहळा १५ जुलै रोजी उळे आणि संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा १८ जुलै रोजी अकलूज येथे या सर्व संतांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे़ पालखी सोहळ्यांचे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर या सोहळ्यातील वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ होतात़ त्यामुळे पंढरपुरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ हे सर्व नियोजन लक्षात घेऊनच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येते़
या विभागात लगीनघाई
- पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाºया वारकरी, भाविकभक्तांच्या सेवेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर नगरपरिषद, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायती, तालुका आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे प्रशासन, वीज वितरण या विभागांमध्ये लगीनघाई सुरू असल्याचे दिसून येते़