२४८ व्यसनमुक्त केंद्रे उभारून २५ हजार व्यक्तींना केले व्यसनमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:07 AM2019-08-26T10:07:13+5:302019-08-26T10:09:57+5:30
सांगोल्याच्या मुख्याध्यापकाने घेतला व्यसनमुक्तीचा ध्यास; उद्ध्वस्त संसार सुखी करण्याचा प्रयास
अरुण लिगाडे
सांगोला : व्यसनामुळे कुटुंबात होणारे ताणतणाव व त्यामुळे उद्ध्वस्त होणारे संसार लहानपणीच पाहिल्यामुळे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त अभियानात काम केले़ त्यांच्या प्रेरणेने स्वत:च एक संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटकात २४८ व्यसनमुक्त केंद्रे सुरु करुन आजपर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना व्यसनांपासून दूर केले. अशा व्यसनमुक्त करणाºया अवलियाचे नाव आहे प्राचार्य दिगंबर साळुंखे.
मूळचे वाटंबरेचे व सोनंद येथील केंद्रीय आश्रमशाळेत मुख्याध्यापक असलेले दिगंबर भागवत साळुंखे यांनी १९९९ ते २००२ या काळात ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघात कासारशिरंबे काम केले. तेथील व्यसनमुक्तीवरील व्याख्याने ऐकल्यानंतर वाटंबरे या आपल्या गावी व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नाही. मात्र व्यसनमुक्तीसाठी काम करण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०१६ मध्ये समर्थ बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून काम सुरु केले.
२०१७ मध्ये व्यसनमुक्तीवर ८५ हजार लोकांचे प्रबोधन केले. व्यसनमुक्तीचे काम करणारेच सादिक शेख यांची भेट झाली. त्यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त भारत हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांमध्ये कोणताही दुष्परिणाम न होता २५ हजारांपेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या १७ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य सुरु आहे. प्रत्येक शाखाधारकाला कोल्हापूर येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन शाखा सुरु करण्यास परवानगी दिली जाते. व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन म्हणून चांगले काम करणाºया व्यक्तीस व्यसनमुक्तदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. आजपर्यंत २३ जणांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच आदर्श व्यसनमुक्ती केंद्र म्हणून राजेगाव (ता. दौंड) येथील केंद्राचा गौरव केला आहे.
उद्ध्वस्त होणारे संसार वाचविण्यासाठी खटाटोप
व्यसनमुक्ती केंद्रात मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येतो़ केवळ प्रबोधन करुन व्यसनमुक्त करता येणार नाही तर त्याला एका वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते़ त्यासाठीच व्यसनमुक्त भारत हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे़ व्यसनी लोकांचे प्रमाण कमी होईल, उद्ध्वस्त होणारे संसार वाचावेत, यासाठी हा खटाटोप असल्याचे दिगंबर साळुंखे सांगतात. त्यांच्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन २०१५ साली मानवाधिकार भारत समाजगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.