सातारा, सांगली, पुण्याचे सेतू कार्यालय सुरू, मग साेलापूरचे बंद का?
By राकेश कदम | Published: April 7, 2023 06:27 PM2023-04-07T18:27:40+5:302023-04-07T18:28:02+5:30
प्रणिती शिंदेंचा सवाल : जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर केली टीका
राकेश कदम
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राची मुदत संपणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला ज्ञात हाेते. तरीही नवी निविदा प्रक्रिया काढण्यात विलंब का झाला? सेतू सुविधा केंद्र तत्काळ सुरू करा, अशी मागणी काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
आमदार प्रणिती शिंदे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना पत्र पाठविले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, साेलापुरातील सेतू कार्यालय १ एप्रिल २०२३ पासून अचानक बंद केले. नवे शैक्षणिक वर्ष सुरू हाेण्यापूर्वी शहरातील बहुसंख्य विद्यार्थी व नागरीकांना सेतू सुविधा केंद्रातून दाखले काढण्याचा प्रयत्न करतात. हे कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी व नागरीक यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सेतू कार्यालय सोडून इतर सुविधा केंद्रांमधून दाखले काढण्यासाठी अधिकचे पैसे घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी सेतू कार्यालय सुरू आहेत. केवळ साेलापुरातील सेतू बंद ठेवण्यामागे काय उद्देश असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.
तुम्ही गप्प का राहिलात ?
सेतू कार्यालयाची निविदा ३१ मार्च २०२३ रोजी संपणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला ज्ञात हाेते. त्या आधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जुन्या कंत्राटदारास मुदतवाढ देणे अथवा नवीन टेंडर काढणे गरजेचे आहे. परंतु तसे झालेले नाही. सेतू कार्यालय सुरु करण्यासाठी विद्यार्थी व नागरीकांनी मला संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली आहे. इतर सुविधा केंद्रांमधून कशाप्रकारे अधिकचे पैसे घेतले जातात ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनाने तत्काळ ताेडगा काढायला हवा