सेवाधारी व मानकरी उपस्थित रंगला शिव-पार्वतीचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:34+5:302021-04-23T04:23:34+5:30
माळशिरस : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथील यात्रापर्व सुरू आहे. धज बांधणीनंतर रात्री देवाचा विवाह सोहळा पार पडला. ...
माळशिरस : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथील यात्रापर्व
सुरू आहे. धज बांधणीनंतर रात्री देवाचा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या
सावटाखाली विधी सोहळे पार पडले. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या
शिव-पार्वतीचे विवाह केवळ सेवाधारी व मानकरी मंडळींच्या उपस्थितीत रंगला.
प्रशासकीय निर्बंधांचे पालन करत अतिशय साधेपणाने हा विवाह लावला गेला.
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा दरवर्षी चैत्रशुद्ध
पंचमी ते पौर्णिमा या काळात होते. शिंगणापूर यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रासह
आंध्र, कर्नाटकातून जवळपास ७ लाख भाविक दाखल होत असतात. मात्र कोरोनाच्या
वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने यंदा यात्रा उत्सवांवर निर्बंध घातले.--असा पार पडला सोहळा
आदल्या
दिवशी शंभू महादेव मंदिर ते अमृतेश्वर मंदिर कळसाला मानाचे पागोटे (धज)
बांधण्याचा सोहळा पार पडला. मराठवाड्यातील आवसगाव, कोळगाव व खामसवाडी येथील
मानकरी, भाविकांनी पोहोचवलेल्या पागोट्यांचे विधिवत पद्धतीने पूजन करून
सेवाधारी मंडळींच्या हस्ते धज बांधण्याचा सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री
१२ वाजता शंभू महादेव मंदिरात लग्न बोहोल्यावर शिवपार्वती विवाह सोहळा पार
पडला. यावेळी वधू-वरांकडील जिरायतखाने, वाघमोडे, सालकरी, बडवे, जंगम असे
मोजकेच सेवाधारी व मानकरी उपस्थित होते. ज्वारीच्या अक्षता व गुलाबी रंगाची
उधळण करत, मंगलमय सुरात मंगलाष्टके म्हणत साधेपणाने शिव-पार्वती विवाह
सोहळा पार पडला. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी लाखो वऱ्हाडी मंडळींच्या
अनुपस्थित विवाह सोहळा पार पडला.