व्हील चेअरवरुन ‘तो’ हाकतो तब्बल सात उंटांचा काफिला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:39 PM2019-05-13T12:39:08+5:302019-05-13T12:41:52+5:30
सोलापूरच्या खरातांचा अनोखा व्यवसाय; चिमुकल्यांना उंटावर बसवून चार पैसे मिळविण्यासाठी भटकंती
मिलिंद राऊळ
सोलापूर : उंटावर स्वार होणं... त्यावर एक फेरफटका मारताना शरीराची विशिष्ट हालचाल होताना चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. हाच आनंद घेऊन चार कुटुंबांचा प्रमुख असलेला अपंग व्यावसायिक आपल्या व्हील चेअरवरुन तब्बल सात उंटांचा प्रवास करताना संसाराचा गाडा हाकताना दिसतो आहे. मोकळी मैदानं हीच आपली घरं.. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी घराचंही स्थलांतरही होताना भटकंतीने त्यांची पाठ सोडलेली नाही.
राजस्थानच्या वाळवंटात दिसणारे काही उंट आता सोलापुरातील बालचिमुकल्यांचे आकर्षण बनले आहेत. बालचिमुकल्यांसाठी असलेले हे आकर्षण काहींना उंटावरील स्वारीचा व्यवसाय मिळवून दिला. माढा तालुक्यातील टेंभुर्णीनजीक असलेल्या माळेगावातील चार कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात स्थिरावले आहेत.
या कुटुंबाचे दौलत मनोहर खरात हे तसे अपंग. २० वर्षांपूर्वी लकवा मारल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. असे असतानाही आजही व्हील चेअरचा (अपंगासाठी असलेली तीन चाकी सायकल) आधार घेत दौलत सकाळी ७ वाजताच झोपडीबाहेर पडतात.
आज कुठे जायचं अन् कुठल्या भागातील चिमुकल्यांना उंटाची स्वारी घडवायची, याचा जणू आदेश दौलतराव देत असतात. तेथून सातही उंटाचे मालक ज्या-त्या कॉलनीत, नगरांमध्ये जातात.
कधी-कधी मोठमोठ्या अपार्टमेंटसमोर थांबून चिमुकल्यांना उंटाची स्वारी घडवून आणतात. ८ ते १० मिनिटाच्या स्वारीसाठी १० रुपये मिळतात. कधी-कधी एकाच घरातील तीन-चार चिमुकल्यांना एकत्र स्वारी घडवून आणताना जादा पैसेही मिळतात.
उच्चभ्रू अथवा मध्यमवर्गीय वसाहतीत हे उंट फिरवताना चार अधिक पैसे मिळतील, अशी आशाही ही मंडळी बाळगून असतात.
पाण्यासाठी मिठाचे समीकरण
- राजस्थानातील उंट विक्रीसाठी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील माळेगाव (घोडा) येथे येतात. एका उंटाची किंमत ७० ते ८० हजार रुपयांच्या घरात असते. या उंटांना सोलापुरात आणले तर इथल्या वातावरणात ते पाणी पित नाहीत. पाणी पिले नाही तर त्यांचे आयुष्य कमी होते. त्यांचे आयुष्य वाढावे म्हणून त्यांना हरभºयाबरोबर मीठही दिले जाते. मीठ खाल्ल्याने त्यांना तहान लागते, म्हणून मीठ खाऊ घालण्याची पद्धत असल्याचे दौलत मनोहर खरात यांनी सांगितले.
एका उंटाचा दररोजचा खर्च दीडशे रुपये
- सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत म्हणजे १४ तास ही मंडळी दारोदारी जातात. दिवसभरात कधी ४०० तर कधी ६०० रुपये मिळतात. रविवारी आणि सुटीदिवशी हजार रुपयेही मिळतात. त्यातून उंटाला लागणारा चारा, हरभºयासाठी दररोज १५० रुपये खर्च करावे लागत असल्याचे अजित दौलत खरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शाही मिरवणुकीत उंटाचा मानच न्यारा
- सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर आहे. विविध जयंत्या, यात्रा, लग्न समारंभातील शाही मिरवणुकीत उंटांना चांगलाच मान असतो. हौशी सोलापूरकर मंडळींमुळे कधी दोन तर कधी चार उंटाच्या जोड्यांना मागणी असते. त्यातून एक हजार रुपयांपासून ५ हजार रुपये मिळत असल्याचेही दौलत खरात यांनी सांगितले.