सेव्हन हिल्स अपहार प्रकरणात ३९०० पानांचे दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:56 PM2018-03-27T12:56:13+5:302018-03-27T12:56:13+5:30
कोट्यवधींची फसवणूक करणारी सेव्हन हिल्स कंपनी, सात अटकेत तर नऊ आरोपी फरार
सोलापूर : सोलापुरातील गुंतवणूकदारांची १.११ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सेव्हन हिल्स कंपनीविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने ३ हजार ९०० पानांचे दोषारोपपत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांच्या न्यायालयात दाखल केले.
सेव्हन हिल्स रिअॅलिटिज प्रा. लि. कंपनीने सोलापूर शहरात मोबाईल गल्लीत २०१२ साली कार्यालय सुरु केले. सन २०१५ या कालावधीत कंपनीने पिग्मी योजना, दामदुप्पट योजना,मंथली इन्कम, सुवर्ण योजना अशा प्रकारच्या योजना तयार करुन त्यामध्ये १५०० पेक्षा जास्त नागरिकांनी गुंतवणूक केली. यात १ कोटी ११ लाखांची फसवणूक झाल्याबद्दल संतोष वसंतराव शिर्के यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सेव्हन हिल्सचे संचालक,चेअरमन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला होता.
या गुन्ह्याची व्याप्ती पाहून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली तर नऊ जण अद्यापही फरार आहेत. या प्रकरणात ३८० जण साक्षीदार आहेत. आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे, सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर तर मूळ फिर्यादीकडून अॅड. जयदीप माने काम पाहत आहेत.
अटकेत असलेले आरोपी असे
- विशाल दत्तात्रय मोरे (वय ३२, निराळे वस्ती, सोलापूर), प्रसाद बाबासाहेब लाड (वय ४०,रा. डीमार्ट जवळ), एन. प्रसाद रेड्डी (वय ४०, रा. कर्नाटक), व्ही. विजयकुमार (वय ३९,रा. कृष्णगिरी, तामिळनाडू), एकनाथ नामदेव ढगे (वय ४८,रा. विजापूर), नागराज रेड्डी , रघुवीर प्रेमसिंग नायक (वय ३४).
फरार असलेले आरोपी असे
- जी़ नारायणप्पा गिडप्पा( रा. कर्नाटक), वाय. आर. मधुसूदन (रा.कृष्णगिरी कर्नाटक), रामचंद्र गुरप्पा सिक्कनपली(रा.मंडय्या कर्नाटक), टी. राजहै (रा. कर्नाटक), एन. प्रमिला (रा. कर्नाटक), पेनूकोंडा चंद्रशेखर अकुला (रा. आंधप्रदेश), दसप्पा हणमंतराजू (रा. कर्नाटक), वालमिकी नरसिंहम्हलू थिरुमलेश (रा. आंधप्रदेश) अशी फरार दाखविलेल्या आरोपींची नावे आहेत.