कर्नाटक एक्सप्रेसमधील सहा प्रवाशांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 07:37 PM2019-04-20T19:37:00+5:302019-04-20T19:41:21+5:30
गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा झाला प्रयत्न, दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर, कुर्डूवाडी उपचार सुरू
कुर्डूवाडी/ सोलापूर : कर्नाटक एक्सप्रेसमधील सहा प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. यातील दोघां प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. यातील सर्वच प्रवासी अजूनही गुंगीतच असल्याने किती ऐवज लंपास झाला याविषयीची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
दरम्यान, शशीकपूर, वय ५० रा.देहू रोड पुणे, मोहम्मद शाहीद मोहम्मद वय ५३ रा.मुजफफरपूर बिहार, थाना कटारा, पोस्ट परसील, मोहम्मद रउफ (वय ४० रा गौंडा जि.बालमपूर), अक्षय पांडे (वय २३ रा.संगमविहार दिल्ली), मोहम्मद साहील आलम (वय २५ रा. परसोल कटरा जि.मुजफफरपूर), मुस्ताक अहेमद अलीमुददीन खान (रा.मोईरंग विष्णूपूर मणिपूर ) अशी विषबाधा झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बेंगलोर-दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसमधील जनरल डब्यातून प्रवासी प्रवास करीत होते. या दरम्यान हिंदूपूरा स्टेशन येण्यापूर्वी कोणीतरी ‘माझा’ हे थंड पेय प्लास्टीकच्या ग्लासामधून या ६ जणांना दिले, त्यानंतर त्यांना गुंगी आली व ते झोपी गेल्याचे मोहम्मद आलम या शुध्दीवर आलेल्या प्रवाशाने सांगितले. याबाबत एक्सप्रेसमधील प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचा रेल्वे आरपीएफ कंट्रोलहून कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात संदेश आला. त्यानुसार रेल्वे आरपीएफचे थाना प्रभारी पोलीस निरीक्षक नेटके, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दरेकर व आकाश वीटे हे आपल्या कर्मचा-यासह कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर हजर झाले़, त्यांनी गाडीच्या प्रत्येक डब्यात पेशंट - पेशंट अशी हाक मारली. यावेळी जनरल डब्यातील प्रवाशांनी ६ सहप्रवासी असल्याची माहिती दिली. या प्रवासी पेशंटना रेल्वेतून पोलीस व आरपीएफ जवानांनी उचलून खाली घेतले.
या दरम्यान स्थानकावर आलेले रेल्वे हॉस्पीटलच्या मंडल महा चिकीत्सक अधिकारी डॉ.शहीदा शेख व त्यांच्या स्टाफने तपासणी करुन कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशीकांत त्रिंबके व स्टाफने सर्वांवर प्राथमिक उपचार केले.