सात हजार रेल्वे प्रवाशांनी केला विनामास्क प्रवास; १२ लाख ७२ हजाराचा दंड वसूल
By appasaheb.patil | Published: June 3, 2021 04:02 PM2021-06-03T16:02:33+5:302021-06-03T16:31:21+5:30
१२ लाख ७२ हजाराचा दंड वसूल - स्थानक अन् रेल्वेत थुंकणार्यांकडूनही वसूल केला दंड
सोलापूर - कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मध्य रेल्वेनेरेल्वे परिसरात आणि रेल्वे प्रवासात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालणार्यांकडून प्रत्येक व्यक्तींना ५०० रूपये दंड केला जात होता. मध्य रेल्वे विभागाने ५० दिवसात मास्क न घालणार्या ७ हजार १४३ जणांवर कारवाई करून १२ लाख ७२ हजार ८२५ रूपयांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वे परिसरात किंवा रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळून आल्यास अथवा कुठेही थुंकण्यामुळे रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरेल. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. कोरोना काळात अस्वच्छता पसरविल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे मध्य रेल्वेने १७ एप्रिल रोजी मास्क न घालणार्याविरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले. त्यानंतर १७ एप्रिल ते ते २ जूनपर्यंत मास्क न घालणार्याविरोधात कारवाई केली. रेल्वे परिसर अथवा रेल्वेत असताना विनामास्क सापडल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसर अथवा रेल्वेत थुंकून परिसर अस्वच्छ केल्यासही ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी विना मास्क घातलेल्या प्रवाशांकडून दंड वसूली केली आहे.
विभागनिहाय कारवाई आणि दंडाची रक्कम
विभाग केसेस दंडाची रक्कम
- मुंबई विभाग - १२६९ - २ लाख ४० हजार ६४५
- भुसावळ - २९२८ - ३ लाख ५४ हजार १५०
- नागपूर - १९५३ - ४ लाख २ हजार ३००
- पुणे - ५२५ - १ लाख ६९ हजार ९८०
- सोलापूर - ४६८ - १ लाख ५ हजार ७५०
- एकूण - ७१४३ - १२ लाख ७२ हजार ८२५
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पालन करण्यात येत आहे. मास्क न घातलेल्यांवर कारवाईची मोहिम सुरू आहे. कोरोना संपेपर्यंत ही मोहिम अशीच सुरू राहणार आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
- शिवाजी सुतार, रेल्वे अधिकारी, मध्य रेल्वे विभाग.