मोडनिंब आडत बाजारातून दररोज सात ट्रक बोरं परराज्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:15+5:302020-12-31T04:22:15+5:30
मोडनिंब : मोडनिंब बाजारातून सध्या बोरांची आवक वाढली असून, दरही वधारला आहे. या बाजार समितीततून दररोज सात ट्रक बोरं ...
मोडनिंब : मोडनिंब बाजारातून सध्या बोरांची आवक वाढली असून, दरही वधारला आहे. या बाजार समितीततून दररोज सात ट्रक बोरं महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये विक्रीसाठी जात आहेत.
काही दिवसांपूर्वी बोरांना भाव नसल्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसला. बाजारात सुरुवातीला वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो शेतकऱ्यांना दर मिळाला. मात्र यंदाच्या वर्षी तीन ते पाच रुपये प्रति किलो दर मिळाला. शेतकरी अडचणीत सापडला होता. अनेक शेतकऱ्यांनी झाडाखाली पडलेली बोरं विक्रीसाठी बाजारात न आणता शेतातच टाकून दिली. त्यामुळे नुकसान झाले. त्यातच आणखी भर पडली ती थंडीची. मागील महिन्यात थंडी कमी होती. ढगाळ वातावरण होते. त्यामुळे झाडावरील बोरं गळाली. ही बोरं वेचणीचा खर्च, लागणारा बारदाना, वाहतूक हे परवडले नाही. अशा काळात बोरं उत्पादकांनी त्याकडे पाठ फिरवली. ज्या शेतकऱ्यांनी छाटणी केली होती. त्यांच्या झाडांना उशिरा बोरं लागली. आता ही बोरेे बाजार समितीतीत येत आहेत. १५ रुपये किलो दर मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र यापूर्वी ढगाळ वातावरण व घसरलेला दर यामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.