सत्तर हजार विद्यार्थ्यांना मिळणार शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके
By रवींद्र देशमुख | Published: May 21, 2024 05:24 PM2024-05-21T17:24:13+5:302024-05-21T17:24:51+5:30
एक जून नंतर सर्व शाळांना पाठ्यपुस्तके.
रवींद्र देशमुख,सोलापूर: सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या आणि सर्व माध्यमाच्या खाजगी शाळाची शैक्षणिक वर्षाची सुरुवात शनिवार दि.१५ जूनपासून होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी सहा माध्यमाच्या ३२७ पात्र शाळेतील ७० हजार १८२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून एक जून नंतर सर्व शाळांना वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तके दिली जातील अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी दिली आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके बालभारती पुणे येथून दोन ट्रक पाठ्यपुस्तके सोलापूर शहर साधन केंद्र ०१, मनपा मराठी मुलांची केंद्र शाळा क्रमांक ६ येथे आली असून बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचे मराठी विभागाचे माजी सदस्य पद्माकर कुलकर्णी, पर्यवेक्षक संतोष बुलबुले, भगवान मुंडे, समग्र शिक्षाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रियाज अत्तार, यांच्या प्रमुख उपस्थितीत उतरून घेण्यात आली. याप्रसंगी प्रशांत साठे विषय साधन व्यक्ती, अमोल धस विशेष शिक्षक, प्रसन्न देवनुर, श्रीशैल भागानवर, राजू नाईकवाडी आदी कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर शहरातील मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि उर्दू या सर्व माध्यमाचे मिळून ३२७ शाळा मधील पहिली ते आठवीच्या ७० हजार १८२ विद्यार्थ्यांना २ लाख ९२ हजार ९०२ पाठ्यपुस्तकांचे वाटप त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या आणि मान्यवर पालकांच्या हस्ते शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप केले जाणार आहे. त्या दिवशी मुलांचे शाळेत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. शाळांची स्वच्छता करणे, वर्गाची सजावट करणे, तसेच मुलांचे स्वागत वाजत गाजत करणे, यासह गुलाब पुष्प देऊन विविध रंगांचे फुगे उडवून आणि मिठाई देऊन करण्यात येणार आहे. याची तयारी करण्यासाठी शिक्षकांना दोन दिवस आधीच म्हणजेच गुरुवार दिनांक १३ जून पासून शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना प्रशासनाधिकारी संजय जविर यांनी केल्या आहेत.
पुस्तकाला कोरी पाने जोडल्याने दप्तराचे ओझे कमी!
यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता निहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात सर्वच विषयांचे धडे असणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या या पुस्तकात एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. राज्य सरकारने ८ मार्च २०२३ साली राज्य सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. यात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकाचे ओझे कमी होणार आहे.