जे सांडपाणी उजनीतून उचलायच म्हणतात ते पाणीच उजनीत येत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:44+5:302021-05-13T04:22:44+5:30
मंगळवारी ११ मे रोजी प्रा. बंडगर पुण्याच्या खालील बाजूस भीमा नदीवर असलेल्या कोल्हापूर ...
मंगळवारी ११ मे रोजी प्रा. बंडगर पुण्याच्या खालील बाजूस भीमा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या सहा साखळी बंधाऱ्यापैकी शेवटच्या असलेल्या पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील बंधाऱ्यावर जाऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
पुढे बोलताना बंडगर म्हणाले की, पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून १६.५ टी. एम. सी. पाण्याचा हिशेब सांगताना मुंढव्याजवळ जुना मुठा कालव्यातून खडकवासला कॅनालमध्ये ६.५ टी. एम. सी. पाणी लाभक्षेत्रासाठी सोडले जाते असे सांगते. तसेच पुरंदर योजनेतून ४ टी. एम. सी. पाणी सोडले जाते असल्याचे सांगते.
उर्वरित ५ टी. एम. सी. सांडपाणी भीमा नदीवाटे उजनीत येते व हे पाणी उजनीतून उचलून आम्ही खडकवासला कॅनालमधे शेटफळ गडे येथे खडकवासला कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करणार असल्याचे सांगून सोलापूर जिल्ह्याची फसवणूक करत आहेत.
कारण जे ५ टी एम सांडपाणी पाणी उजनीत येत असल्याचे सांगितले जाते ते प्रत्यक्षात उजनीत येत नसल्याचे बंडगर यांचे म्हणणे आहे. याच स्पष्टीकरण देताना ते सांगतात की, सिद्धटेक ते पुणे दरम्यान एकूण सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे १५ ऑक्टोबरनंतर बंद केले जातात. त्यामुळे पाणी खाली येतच नाही. जागोजागी भीमेच्या तीरावर हजारो एकर शेतीसाठी हजारो शेतीपंप असून, हेच सांडपाणी दोन्ही तीरावरील शेतीला दिले जात आहे. दौंडसारख्या मोठ्या शहराला तसेच तीरावरील सर्व गावांना याच पाण्यातून पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे उजनीत १५ऑक्टोबरनंतर सांडपाणीच येत नाही. या सहा बंधारा साखळीत सध्या कसलेच पाणी नसल्याचे प्रत्यक्ष पाहणी करून आल्यानंतर बंडगर यानी सांगितले.
त्यामुळे उजनीतून मूळ सिंचन आराखड्यातूनच सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी सरकार नेणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सांडपाण्याला काय, उजनीमध्ये वेगळा कप्पा आहे की काय, असा खोचक प्रश्नही यानी केला.
सरकारला आवाहन करताना बंडगर म्हणाले की, सरकारने लोकांची दिशाभूल थांबवावी. विनाकारण संघर्ष वाढवू नये. आणखी संघर्ष समिती व सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर बैठक लावावी. चर्चेने मार्ग निघतात.
आणखी जे पाच टीएमसी सांडपाणी सरकारला इंदापूरला न्यायचे आहे ते पेठ वडगाव येथील बंधाऱ्यावर बॅरेज उभारून न्यावे. म्हणजे पुनर्वसनाचा पण प्रश्न उद्भवत नाही. आणि वरील नदीकाठावरील दौंडसह सर्व घटकांना पाणी मिळेल.
मात्र उजनीतून पाणी उचलण्यास आपला विरोध आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत राहील.
फोटो ओळी :
भीमा नदीवरील पेडगाव (ता.श्रीगोंदा) येथील साखळी बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे.
---