शाडूचे गणपती घरोघरी; गणरायाची मूर्ती तयार करणाºयांसाठी देणार माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:23 PM2020-07-29T12:23:47+5:302020-07-29T12:27:20+5:30
मूर्तिकार शरणबसप्पा कुंभार यांचा पुढाकार : प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा होतो विपरीत परिणाम
सोलापूर : प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचा विपरीत परिणाम मानवी जीवनशैलीवर होतो. हे रोखण्यासाठी तीन पिढ्यांपासून आम्ही शाडू अन् मातीच्या गणेशमूर्ती तयार करतो. आताच्या पिढीने तर शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले आहे, असे सांगतानाच यंदाच्या गणेशोत्सवात अशा मूर्ती कोणी तयार करणार असेल तर आम्ही माती उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नीलम नगर येथील प्रसिद्ध मूर्तिकार शरणबसप्पा कुंभार यांनी दिली.
कोरोना काळात येणाºया यंदाच्या गणेशोत्सवातसोलापूरकरांना संसर्गापासून अधिकाधिक सुरक्षित ठेवण्यासाठी ‘लोकमत’ने ‘शाडूच्या मूर्ती घरोघरी’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार कुंभार यांच्याशी संवाद साधला.
यंदा कुंभार परिवाराने तीन हजारांहून अधिक शाडूच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. पन्नास वर्षांहून अधिक काळापासून कुंभार परिवार मातीच्या गणेशमूर्ती तयार करत आहे. यंदा त्यांनी आॅरेंज कलरच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. गणरायाचं किरीट तेही सोनेरी आहे.
ब्लॅक अँड व्हाईट रंगांनी डोळे बोलके बनले आहेत. सर्व मूर्ती सुंदर, सुबक आणि आकर्षक आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपेक्षा अधिक पटीने या मूर्तींमध्ये सुंदरता असल्याचे दिसून आले.
शाडू गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य
- घरातच विसर्जन करता येते.
- पाण्यात लवकर विरघळतात.
- पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होत नाही.
- मातीचा पुनर्वापर करता येईल.
- पीओपीपेक्षा अधिक मजबूत.
- मूर्तीत अधिक सुंदरता येते.
शाडूच्या मूर्ती खरेदीला अलीकडच्या काळात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पीओपीपेक्षा शाडूच्या मूर्ती महाग असल्या तरी अधिक टिकाऊ असतात. भविष्य हा शाडूच्या मूर्तींचा आहे. त्यामुळे भविष्यात या मूर्तींच्या किमती कमी होतील. पर्यावरणाचीही हानी होणार नाही. सोलापुरात कोणी शाडूच्या मूर्ती बनवायला तयार असतील तर त्यांना मी माती उपलब्ध करून देणार आहे.
- शरणबसप्पा कुंभार, गणेश मूर्तिकार